पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफर यांनी अलीकडेच सांगितले की, ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे दुसऱ्या अभिनेत्यासोबत पुन्हा चित्रीकरण करण्यात आले होते. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपट ‘डिअर जिंदगी’मध्ये त्यांनी रूमी नावाच्या संगीतकाराची भूमिका साकारली होती. अली यांच्या म्हणण्यानुसार, भारत-पाकिस्तानमधील राजकीय तणाव वाढल्यानंतर त्यांच्या भूमिकेचा भाग दुसऱ्या अभिनेत्यासोबत पुन्हा शूट करण्यात आला होता. मात्र, दिग्दर्शिका गौरी शिंदे यांना या भूमिकेत अली जफर यांनाच कायम ठेवायचे होते. अली यांनी असेही सांगितले की, शाहरुख खान यांनीही चित्रपटात त्यांची भूमिका कायम ठेवण्यासाठी विशेष विनंती केली होती, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यावेळी माहिरा खान देखील शाहरुखच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाचा भाग होत्या. अखेरीस, चित्रपटात रूमीची भूमिका अली जफर यांनीच साकारली. अली यांनी मुलाखतीत उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करत सांगितले की, भारत-पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर बॉलिवूडमधील त्यांचे काम संपुष्टात आले. त्यानंतर त्यांचा एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. ‘डियर जिंदगी’ हा त्यांचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ठरला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्याबाबतचा विरोध तीव्र झाला. 18 फेब्रुवारी 2019 रोजी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीत काम करण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. दरम्यान, 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी चित्रपट, वेब सीरिज, गाणी आणि पॉडकास्टवर बंदी घातली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने IT नियम 2021 अंतर्गत OTT आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मना पाकिस्तानी कंटेंट हटवण्याचे आदेश दिले. याशिवाय अनेक पाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया अकाउंट्सही भारतात तात्पुरती ब्लॉक करण्यात आली. यामध्ये माहिरा खान आणि हानिया आमिर यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. अलीचा पहिला बॉलिवूड चित्रपटही यापूर्वी अडचणीत सापडला होता अली जफरच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून झाली. या चित्रपटात त्याने एका पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका साकारली होती, जो अमेरिकेत जाण्यासाठी ओसामा बिन लादेनचा बनावट व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटाचा विषय संवेदनशील होता. सांगायचं झालं तर, चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसांत 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला झाला होता. अलीने मुलाखतीत सांगितले की, त्या वेळी शूटिंगचे फक्त दोन-तीन दिवस बाकी होते. त्यांना पाकिस्तानला परतण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र त्यांनी शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नंतर हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यांना ओळख मिळाली. यानंतर अलीने ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क’, ‘चश्मेबद्दूर’, ‘टोटल सियापा’ आणि ‘किल दिल’ यांसारख्या भारतीय चित्रपटांमध्ये काम केले. ‘डियर जिंदगी’ हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin