![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर चर्चेत आलेला एक फोटो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या छायाचित्रात ठाकरे गट सोडल्याची चर्चा असलेले काही खासदार आणि शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा एकत्र दिसत आहेत. मात्र, हा फोटो नेमका ‘ऑपरेशन टायगर’शी संबंधित आहे की जुन्या कार्यक्रमातील आहे, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. फोटोत कोण-कोण दिसत आहेत? समोर आलेल्या छायाचित्रात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे दिसून येत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे तिघेही शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसते. या फोटोमुळे ‘ऑपरेशन टायगर’ची आखणी अनेक महिन्यांपासून सुरू होती का, याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे तसेच अभिषेक वर्मा यांच्या रणनीतीमुळे ही संपूर्ण मोहीम यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. फोटोबाबत नवा दावा, संभ्रम कायम मात्र, या फोटोबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, हे छायाचित्र अभिषेक वर्मा यांच्या २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा फोटो प्रत्यक्ष ‘ऑपरेशन टायगर’च्या बैठकीचा पुरावा आहे की केवळ जुन्या सामाजिक कार्यक्रमातील छायाचित्र आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही. यामुळे या फोटोभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू होत्या गुप्त भेटी? दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामागे दीर्घकालीन रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित खासदारांच्या गुप्त बैठका आणि संपर्क सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातूनच अखेर ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे समोर आले. या सहा खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ठाकरे गटाचीही हालचाल वाढली दुसरीकडे, या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनीही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांतील जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. सध्या चर्चेत असलेला हा फोटो ‘ऑपरेशन टायगर’च्या गुप्त बैठकीचा आहे की केवळ वाढदिवसाच्या कार्यक्रमातील, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसले तरी या छायाचित्राने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
फुटीर खासदारांच्या छायाचित्रावरून नवा ट्विस्ट:'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो की वाढदिवसाची पार्टी? पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीने चर्चांना उधाण
