ठाकरे गटाची मध्यरात्री मोठी खेळी:ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी वरुण सरदेसाई पुण्यात, गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका




शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अज्ञातवासात असल्याची माहिती असताना, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा खटल्याचा काल न्यायालयात निकाल लागल्यानंतर ओमराजे पुण्यातील आपल्या निवासस्थानी परतले. त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ओमराजे यांचे बंड थंड करण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाने मध्यरात्री एक मोठी खेळी खेळली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे यांच्यावर जाहीर टीका केली असली, तरी पडद्यामागे मात्र त्यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे मध्यरात्री अत्यंत गुप्तपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे गटाची ही रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. जर ओमराजे निंबाळकर यांचे बंड शांत करण्यात ठाकरे गटाला यश आले, तर दिल्लीत असलेल्या उर्वरित ५ बंडखोर खासदारांचे गणित बिघडू शकते आणि त्यांचा गट धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच ठाकरे गटाकडून ओमराजेंना थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे. गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांच्या या मध्यरात्रीच्या गुप्त भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण साळी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना किरण साळी म्हणाले, “रात्रीच्या अंधारात गाड्या बदलून, कपडे बदलून आणि तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. यावरूनच त्यांची हतबलता दिसून येते. एकीकडे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत जाहीरपणे या खासदारांना गद्दार, खोके आणि अश्लील घाणेरड्या शिव्या देतात; तर दुसरीकडे वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी मध्यरात्री गुपचूप येऊन त्याच खासदारांच्या पाया पडतात! यांची वैचारिक पातळी किती खाली घसरली आहे बघा.” ‘मिशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा किरण साळी यांनी पुढे बोलताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांत मातोश्री आणि पक्षाकडून या खासदारांना जी अपमानास्पद वागणूक दिली गेली, ती हे खासदार कधीही विसरणार नाहीत. सार्वजनिक सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि मध्यरात्री मनधरणी करायला यायचे, हा ठाकरे गटाचा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘मिशन टायगर’ आता पूर्णपणे यशस्वी झाले असून, खासदार योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *