ठाकरेंचा बुरुज ढासळला – VastavNEWSLive.com


ध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची सुरू असलेली चर्चा मराठवाड्यामुळे अधिक रंगलेली आहे. मराठवाड्यातील तीन खासदार यामध्ये असल्याने ठाकरेंचा मराठवाड्यातील बालेकिल्ला ढासळला असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट झाले आहे. हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खा.संजय उर्फ बंडु जाधव, धाराशिवचे खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर हे तिघेही ठाकरेंचे खंदे समर्थक पक्ष सोडून गेल्याने मराठवाड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या मराठवाड्यातील या तिन्ही खासदारांनी शेवटी बंडाचा झेंडा फडकविला. धाराशिवचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे एक वेळेस आमदार आणि दोन वेळेस खासदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत. चार वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार असतानाही त्यांनी तीन लाख २९ हजार मताधिक्यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे त्यांना मतदारसंघातील जनतेची भक्कम साथ असल्याचे स्पष्ट झाले होते. धाराशिव लोकसभा मतदारसंघात जास्त मताधिक्याने निवडून आलेले असल्यामुळे जनाधार विरुद्ध जाण्याची हिम्मतही यापूर्वी राजेनिंबाळकर यांनी केली नव्हती. विरोधी पक्षात राहून मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास करता येत नाही, हीच बाब धाराशिव मतदारसंघाच्या बाबतीत आडवी आल्याचा अंदाज या जिल्ह्यातील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. सत्तेत सहभागी होऊन विकासकामे मार्गी लावता येतील, हे सर्वांचेच राजकीय गणित असते. यासाठीच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ठाकरे गटाशी फारकत घेतल्याचे सांगितले जाते.
मराठवाडा हा एकेकाळी ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता.    बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा मोठा वाटा होता होता. परंतु हळूहळू ठाकरेंना मानणारा नेता वर्ग त्यांच्यापासून दूर गेला. मराठवाड्यातील ठाकरे समर्थक जसजसे पक्ष सोडू लागले तसतसे राज्याचे राजकारण बदलत गेले. याला उद्धव ठाकरे यांचे बिघडत जाणारे राजकीय गणित कारणीभूत असल्याचे मराठवाड्यातून बोलले जात आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात पक्षाशी बंडखोरी करण्याची तसेच पक्षांतर करण्याची परंपरा खा. संजय जाधव यांनी कायम ठेवली आहे. १९८९ पासून परभणी जिल्ह्याने शिवसेनेला एक वेगळी ओळख मिळवून दिली. यापूर्वी खासदार असताना दिवंगत अशोकराव देशमुख,  सुरेश जाधव , तुकाराम रेंगे पाटील, गणेशराव दुधगावकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली होती. या चौघांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला व आत्ताही विद्यमान खासदार संजय जाधव यांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली. खा. संजय जाधव हे यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यानंतर नगरसेवक तसेच बाजार समितीचे सभापती ते खासदार असा त्यांचा राजकीय जीवन प्रवास आहे. यामध्ये २००९ व २०१४ यावेळी विधानसभेच्या परभणी मतदार संघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. २०१४ पासून ते लोकसभेच्या परभणी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात . त्यांची ही खासदारकीची तिसरी टर्म आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेले मोठे बंड उद्धव ठाकरे यांच्या राजकीय रसातळाचे कारण बनले. त्यावेळी खा. संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जेव्हा आदित्य ठाकरे यांना स्थान देण्यात आले तेव्हापासून खा. संजय जाधव हे ठाकरे यांच्यावर नाराज होते .‌अधून मधून त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चाही मराठवाड्यात होत होत्या.‌ गेल्या सहा महिन्यांपासून खा. संजय जाधव यांचे भाषण तसेच उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहणे यावरून त्यांची नाराजी स्पष्ट दिसू लागली होती. उद्धव ठाकरे यांना खा. जाधव यांच्या पक्षांतराची कुणकुण लागली होती. त्यामुळे खा. जाधव समर्थकांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर खा. जाधव यांनी ऑपरेशन टायगरला अधिक बळकटी दिल्याचे मराठवाड्यात बोलले जात आहे. परभणी जिल्ह्यात सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेऊन थेट नागरिकांशी संपर्कात राहणारे नेते म्हणून खा. संजय जाधव यांची परभणी जिल्ह्यात वेगळी ओळख आहे.
मराठवाड्यातील हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी चार दिवसापूर्वी मोठी पत्रकार परिषद घेऊन आपण ठाकरेंचेच समर्थक आहोत, अशी आरोळी ठोकली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र कृष्ण हे नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे निमित्त समोर करून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे बोलावलेली बैठक टाळली होती व त्यांच्यावर टीका सुरू झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा केल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल देखील केला होता. आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याचा केविलवाला प्रयत्न आष्टीकर यांनी केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जात होता. यापूर्वी या मतदारसंघात विलास गुंडेवार, शिवाजी माने ,सुभाष वानखेडे, हेमंत पाटील यांनी शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केलेले आहे . यातील विलास गुंडेवार वगळता इतरांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा कधीच राजकारणात स्थिर झाले नाही,  हा या हिंगोली जिल्ह्याचा इतिहास आहे.
मराठवाड्यात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असे चित्र गेल्या चार वर्षात रंगलेले पहावयास मिळते. यामध्ये शिंदे सेनेने आखलेली रणनीती ठाकरे सेनेच्या अपयशाला कारणीभूत मानली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे राज्यातील सहा खासदार फोडल्याचे सांगितले जाते. यामध्ये मराठवाड्यातील तीन खासदारांचा समावेश असल्याने मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांची असलेली शिवसेना आता संपल्यात जमा आहे. मराठवाड्यातील तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. या सर्व राजकीय घडामोडीमागे भाजपची धनशक्ती असल्याचे सांगितले जाते. सध्या मराठवाड्यातील या तिन्ही खासदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांमध्ये सध्या तरी या तिन्ही खासदारांवर टीका होत आहे. यापूर्वी मराठवाड्यातील आमदारांनी जशी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती, त्यावेळी वातावरण अधिक गंभीर होते. परंतु त्या तुलनेत सध्या या तिन्ही खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी आमदारांचे जसे काही वाकडे झाले नाही तसे खासदारांचेही होणार नाही, अशी चर्चा मराठवाड्यात सध्या रंगलेली आहे.

– डॉ. अभयकुमार दांडगे
मराठवाडा वार्तापत्र


Post Views: 52






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *