15 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन:प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ करणार उद्घाटन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची माहिती

0
new-project-2026-04-22t174047917_1776859882.jpg




नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांच्या नावाची निवड केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी दिली. सातारा येथे आगामी दिनांक 9 आणि 10 मे रोजी 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने साताऱ्याच्या प्रतिसरकारला अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नवी दिल्ली येथील प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ उपस्थित राहणार आहेत. त्या मूळच्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. मिंझ 2005 पासून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली येथे स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्स या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. झारखंडमधील विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून काम प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांनी झारखंडमधील दुमका येथील ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या’ कुलगुरू म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांनी मे 2020 ते जून 2023 मध्ये कुलगुरु म्हणून काम केले. त्यानंतर पुन्हा जवाहलाल नेहरु विद्यापीठात रुजू होत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांची जून 2025 मध्ये यूनेस्को: आदिवासी हक्क याच्या अनुषंगाने असलेल्या समितीच्या सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, असे डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले. प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांनी चेन्नईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जवाहलाल नेहरु विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केली. मिंझ यांनी आयआयटी कानपूरमधून देखील पीएच.डी केली आहे. अशा या आदिवासी समाजातील उच्चशिक्षित व तरीही आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथील 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून झालेली निवड ही नक्कीच विद्रोही चळवळीला बळ देणारी ठरेल, असे संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. डॉ सुहास महाराज फडतरे व कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed