पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई:11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 9 जणांना अटक, पहिलीच कारवाई

0
6a856110-7695-43af-89ba-3fa91346e15b_1776857447151.jpg




पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी कठोर पावले उचलली आहेत. एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ सदस्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम – १९९९) अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्हेगारांविरुद्ध केलेली ही पहिलीच ‘मकोका’ कारवाई ठरली आहे. या प्रकरणाची सुरुवात २० फेब्रुवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांना बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. पोलिसांनी या तपासादरम्यान विविध बँक खाती गोठवून २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत मिळवून दिली आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत पोलीस पथकाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थानमधील उदयपूर येथून नऊ आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभय बाबासाहेब पाटील (कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (वाघोली, पुणे), युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार (लोहगाव, पुणे), रॉनी उर्फ पंकज मंगु गिरीगोस्वामी (उदयपूर), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (उदयपूर), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (राजस्थान), महेश करबसपा उडचणे (मुंबई), राहुल बहादुरप्रसाद मौर्य (मुंबई) आणि शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. तपासात असे समोर आले की, आरोपींनी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. ही टोळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेला गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत होती. फसवणुकीची रक्कम ‘यूएसडीटी’ सारख्या आभासी चलनात रूपांतरित करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून वर्ग केली जात होती. या टोळीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगार केवळ वैयक्तिक फसवणूक करत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करत असल्याचे लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या टोळीवर मकोका लावण्याचे आदेश दिले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed