![]()
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी (दि. 22) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली असून, कार्यक्रमस्थळी कोणतेही आक्षेपार्ह फलक, चित्र लावू नयेत तसेच धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस (एनएसयूआय) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या परिसरात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूंचे समर्थक आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या ठिकाणी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील दाखल झाले आहेत. आयोजकांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी हा कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला असून, याला सुमारे आठ ते दहा हजार जण प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच, या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी ही आयोजकांवरच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मूलभूत सुविधा आणि सुरक्षेच्या अटी पोलिसांनी आयोजकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या अटी घालून दिल्या आहेत. कार्यक्रमस्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासोबतच, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र रांगा, बाहेर पडण्यासाठी पुरेसे आणि सुरक्षित मार्ग, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, अग्निशामक यंत्रणा आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, खासगी सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षेसाठी विशेष महिला स्वयंसेविका तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक नियोजन या कार्यक्रमाला होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षेसाठी सुमारे 500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक नियोजनासाठी तब्बल 700 वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे 42 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमापूर्वी तणाव:'एनएसयूआय' आणि 'एबीव्हीपी' कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; 'छात्रों की गुंज' कार्यक्रम उद्या
