
बंटी पाटील म्हणजे माणसे तयार करणारी फॅक्टरी आहे. अनेकांना मोठे केले, कोणी गेले, कोणी जाणार, फरक पडत नाही. पण शेवटच्या क्षणी साथ सोडणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा थेट इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज
.
दरम्यान सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की, कोल्हापूर महापालिका हे आपलं एकमेव मिशन आहे. कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. जो कोणी शेवटच्या क्षणी पाठ सोडेल, त्याच्याच वॉर्डात माझा मुक्काम असेल. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, हे लक्षात ठेवा. कोल्हापुरात 26 जुलै रोजी पार पडलेल्या काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार छत्रपती शाहू महाराजही उपस्थित होते.
शेवटपर्यंत काँग्रेससाठीच लढणार
सतेज पाटील म्हणाले की, शाहू महाराज, माझे काही चुकत असेल तर नक्की सांगा. मी आयुष्यभर काँग्रेससाठीच काम करणार. लढाई ही आपली आहे, आता खचून चालणार नाही. जिवाभावाची माणसं हवीत, कारण फौज कितीही मोठी असली, तरी ‘हम ही जितेंगे.
भाजपवर जोरदार टीका
सतेज पाटील म्हणाले की, काँग्रेस म्हणजे केवळ सोशल मिडीया वर फॅन्सी प्रचार नाही, तर थेट लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. विशेषतः 18 ते 25 वयोगटातील तरुणांपर्यंत काँग्रेसने पोहोचले पाहिजे. त्यांना भाजपचा खरा चेहरा दाखवण्याची गरज आहे. चार हजार किलोमीटरची पदयात्रा करणारा राहुल गांधींसारखा नेता भाजपला झेपत नाही. बहुजन समाजाला कमजोर करण्याचे काम भाजप करत आहे.
महायुती सरकारवर हल्लाबोल
सतेज पाटील म्हणाले की, सरकारकडे दिशा नाही, अशी परिस्थिती आहे. बहुमताच्या जोरावर माज आलेला आहे. आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे, आता तरुण ठेकेदारही आत्महत्या करत आहेत. हे गंभीर चित्र आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत सत्ताधारी आमदारही आमची भूमिका योग्य असल्याचे कबूल करत आहेत. त्यामुळे आपण निर्धाराने लढायला हवा.