Supriya Sule | महिला आरक्षणावरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या, ‘दिल्लीच्या दबावामुळे…’
Supriya Sule | महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. Devendra Fadnavis यांनी विरोधी पक्षांवर टीका करत त्यांना ‘महिला विरोधी’ ठरवल्यानंतर आता Supriya Sule यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीच्या दबावाखाली मुख्यमंत्र्यांची विधाने
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस हे एक सुशिक्षित आणि अभ्यासू नेते असल्याने त्यांच्याकडून वेगळ्या भूमिकेची अपेक्षा होती, असे त्या म्हणाल्या. एनडीए (NDA) आघाडीतील सर्व पक्षांना दिल्लीवरून एक ‘नोट’ किंवा ‘ब्रिफिंग’ पाठवले जाते आणि त्याच दबावाखाली मुख्यमंत्री अशी स्क्रिप्टेड विधाने करत असल्याचा दावा सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न
‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या विधेयकाची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांनी सरकारला काही खडे सवाल विचारले आहेत. हे आरक्षण विधेयक २० सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत एकमताने मंजूर झाले असून, २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरीही केली आहे, याची मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे. २०२४ मध्येच लागू होणे अपेक्षित असलेले हे आरक्षण २०२६ उजाडले तरी अद्याप प्रत्यक्ष अमलात का आले नाही?
महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा (Delimitation) परस्पर संबंध काय? राज्यांमध्ये ५० टक्के जागा वाढवणार असे सांगितले होते, मग त्याचा उल्लेख विधेयकात का नव्हता? सरकारने आताच्या घडीला कोणत्याही अटींविना सध्याच्या लोकसभेतील ५४३ जागांवरच तत्काळ ३३ टक्के महिला आरक्षण लागू करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
फडणवीसांना खुल्या चर्चेचे आव्हान
विरोधी पक्षांमुळे लोकशाहीतील महिला सहभागाचा मृत्यू झाला, ही मुख्यमंत्र्यांची टीका खोडून काढत सुप्रिया सुळे यांनी सरकारलाच कोंडीत पकडले. मुख्यमंत्री या मुद्द्यावर खोटे बोलत आहेत असे मला म्हणायचे नाही, पण या संपूर्ण प्रकरणावर त्यांच्यासोबत समोरासमोर बसून चर्चा करण्याची माझी पूर्ण तयारी आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी ठरवलेल्या कोणत्याही ठिकाणी आणि वेळेवर येण्यास आपण तयार आहोत, असे खुले आव्हान देऊन सुळे यांनी फडणवीस यांनी दिलेला लढा स्वीकारला आहे.
News Title: Supriya Sule on Devendra Fadnavis Women Reservation Bill
