गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई:12 शिकारी जेरबंद, दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त; कठोर कायदेशीर कारवाई सुरू
![]()
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गस्ती पथकाने तात्काळ सापळा रचून पाठलाग केला आणि १२ जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून चार शेकरू, एक उडणारी खार, एक हरीनाल पक्षी आणि घुबडांच्या काही प्रजातींसह इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या अवैध शिकारीचे प्रमाण समोर आले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक दिपाली तळमले आणि उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली. वनविभागाने स्पष्ट केले आहे की, आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येतील.
