माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

0
f0a09643-930b-4183-a8cc-30606198d2e7_1776680418862.jpg




माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई नेहमी मांडत असत, असेही डॉ. मुजुमदार यांनी नमूद केले. ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले निवडक लेख मराठी भाषेत समाविष्ट करण्यात आले आहेत. पुणे परिवारतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे, राजेश पांडे, मधुकर भावे, आयोजक ज्योती राठोर, सुरेश उज्जैनवाला, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी आणि भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रतिभाताईंनी आयुष्यभर समाजसेवा केली आणि नवे विचार रुजवले. त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात अनेक महामंडळे स्थापन झाली. त्यामुळे शासन म्हणून ‘भारताची प्रतिभा’ हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, हे पुस्तक प्रतिभाताईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास उलगडते. जळगावमधील एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. एक हळवी माता ते देशाच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा कणखर प्रवास या पुस्तकातून अनुभवता येईल. प्रास्ताविकात पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी यांनी सांगितले की, प्रतिभाताई पाटील यांच्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळातील राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवासावर आधारित ‘भारताची प्रतिभा जीवन गौरव ग्रंथ’ यापूर्वीच प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यातील मान्यवरांचे निवडक लेख घेण्यात आले आहेत. हे पुस्तक त्यांच्या दुर्दम्य व्यक्तिमत्त्व व गुणवैशिष्ट्यांचा ठेवा असून, नव्या पिढीसाठी राज्यातील सर्व शाळा व ग्रंथालयांना वितरित करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारणाऱ्या वीरमाता सुमेधा चिथडे, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अदिती देशपांडे, डॉ.विनिता आपटे, भाग्यश्री चौंडे यांचा समावेश होता. मधुकर भावे यांनी देखील आठवणी सांगितल्या.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks