लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ:कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, पुणे सारसबागेत घडली घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा

0
19519987-cf2e-4555-beec-52af8d9172e3_1776665809622.jpg




पुणे शहरातील सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात ज्येष्ठ लेखक डॉ. संपत गणपत जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यावर बंदुकीच्या दस्ताने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक बैठक संपल्यानंतर फिर्यादी दीपक कुंडलीक कसबे आणि डॉ. संपत जाधव तेथे उपस्थित होते. त्यावेळी आरोपी सहदेव ढावरे आणि प्रमोद नाडे यांनी डॉ. जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दीपक कसबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी प्रवीण शेलारने त्यांना “तुझा मर्डर करीन” अशी धमकी देऊन मारहाण केली. या हल्ल्यात कसबे यांच्या खिशातील रोख रक्कमही गहाळ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांच्या गाड्यांमधून उतरून दीपक कसबे यांना घेरले. आरोपी स्वप्निल सोनवणे याने आपल्याकडील बंदूक प्रमोद नाडे याच्याकडे दिली. नाडेने बंदुकीच्या दस्ताने कसबे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यावेळी “याच्या डोक्यात गोळी घालून संपवून टाका” असे आदेशही देण्यात आले. कसबे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत स्प्रे मारून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. स्वारगेट पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी सहदेव ढावरे, प्रवीण शेलार, प्रमोद नाडे, स्वप्निल सोनवणे आणि ओंकार हिंगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(४), १९१(२), १९१(३), ३५१(१) आणि आर्म्स ॲक्ट ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात शस्त्राचा वापर झाल्यामुळे तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks