छत्रपती संभाजीनगरमध्ये 'चड्डी-बनियान गँग'ची एन्ट्री?:बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी-बनियान गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने एटीएम मशिनचे नुकसान केले असले तरी बँकेची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदण्यात त्याला अपयश आल्याने लाखो रुपयांची रोकड बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारास एका अज्ञात चोरट्याने आकाशवाणी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, हा चोरटा केवळ चड्डी आणि बनियान परिधान केलेल्या अवस्थेत होता. त्याने अतिशय सराईतपणे मशिन तोडण्यासाठी अवजारांचा वापर केला. मात्र, मशिनचे बाह्य कवच तोडल्यानंतर आतील तिजोरी उघडणे त्याला अशक्य झाले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आणि सुरक्षा अलार्म वाजण्याची भीती वाटल्याने चोरट्याने रिकाम्या हाताने तेथून पलायन केले. चड्डी-बनियान गँगची दहशत पुन्हा? या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, त्यावरून पोलिस तपासाला नवीन दिशा मिळाली आहे. चोरट्याची वेशभूषा पाहता, ही चोरी चड्डी-बनियान गँगनेच करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही गँग आपल्या अंगाला तेल लावून आणि कमी कपड्यांमध्ये चोरी करण्यासाठी कुख्यात आहे, जेणेकरून पकडले गेल्यास निसटणे सोपे होईल. शहरातील इतर भागांतही अशा प्रकारची टोळी वावरत असल्याची भीती आता व्यापारी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बँकेकडून तक्रार आणि पोलिसांची कारवाई एटीएम मशिनची तोडफोड झाल्याचे निदर्शनास येताच बँक प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र, गारखेडा शाखेचे व्यवस्थापक अभिनव इंगळे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये शहरात सक्रीय होती गँग दरम्यान, यापूर्वी मार्च २०१७ मध्ये, शहरातील सातारा परिसरातील सुधाकर नगर पोलिस हाउसिंग सोसायटीमध्ये या टोळीने दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे, या सोसायटीत पोलिस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक वास्तव्यास आहेत. चोरांनी येथून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलिस वसाहतीतही या टोळीने निर्भयपणे चोरीची ही घटना घडवून आणली होती. टोळीची कार्यपद्धती कशी? या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. टोळीचे सदस्य अनेकदा रात्रीच्या वेळी केवळ चड्डी आणि बनियान परिधान करून येतात. कोणाच्या हाताला लागू नये किंवा पकडले जाऊ नये म्हणून ते आपल्या शरीराला तेल किंवा ग्रीस लावतात. त्यांच्याकडे काठी किंवा चाकू यांसारखी घातक शस्त्रे असतात, ज्याचा वापर ते प्रतिकार करण्यासाठी करतात.
