"निळवंडे'चे पाणी घराघरात पोहोचवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय -थोरात:राजकारण सत्तेसाठी नव्हे , तर गरिबांच्या जीवनात आनंद निर्माणासाठी‎

0
253_177660124969e4c8a14ebbf_8650.jpg




प्रतिनिधी | संगमनेर “निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचवणे, हेच माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देताना थोरात म्हणाले, पुण्यात लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी असताना अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. मीटर हटाव, टेंभे आंदोलन, मराठवाडा नामांतर आणि निळवंडे पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनात ९ दिवसांचा कारावासही भोगला. संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निळवंडे धरणाबाबतचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, “१९९९ मध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळत असतानाही निळवंडेचे काम मार्गी लावण्यासाठी मी मुद्दाम राज्यमंत्रिपद मागून घेतले. अनंत अडचणींवर मात करून धरणाची भिंत आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. आता प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. काही लोक स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलून गेले आहेत. इतिहास केवळ लढणाऱ्यांचीच नोंद घेतो, पळून जाणाऱ्यांची नाही. नाशिक-पुणे रेल्वे नियोजित मार्गानेच व्हावी यासाठी आपला पाठपुरावा आहे, मात्र तालुक्याची प्रगती रोखण्यासाठी मुद्दाम काही अडचणी निर्माण केल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. सध्या राजकारणात जातीयता वाढली आहे. सत्ताधाऱ्यांनी राजधर्माचे पालन करणे गरजेचे आहे, मात्र सध्या तसे चित्र दिसत नाही. कार्यक्रमात युवकांनी विचारलेल्या रॅपिड फायर प्रश्नांना थोरातांनी दिलखुलास आणि मिश्किल उत्तरे दिली. आभार संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी मानले. प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील टीका दुर्दैवी “आमच्या कुटुंबाला वारकरी आणि पुरोगामी विचारांची बैठक आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे मोठे नेतृत्व असून वडीलधाऱ्यांचा मान ठेवून राजकारण झाले पाहिजे. प्रसिद्धीसाठी केली जाणारी खालच्या पातळीवरील टीका दुर्दैवी आहे, असेही थोरात म्हणाले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks