हिंगोलीत मारहाण प्रकरणात चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला:न्यायालयीन कोठडीत रवानगी; लोखंडी मुसळ व लाकडाने मारहाणीचे प्रकरण
![]()
हिंगोली शहरातील सराफा बाजारात किरकोळ कारणावरून सराफा व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातील चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन अर्ज हिंगोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत अ्रॅड. अविनाश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील सराफा बाजार भागात सराफा व्यापारी साईनाथ उदावंत व त्यांचा मुलगा सागर उदावंत यांनी दुकानाचे बांधकाम सुरु केले होते. काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या या बांधकामामुळे इतर सराफा व्यापाऱ्यांसोबत त्यांची कुरबुर होऊ लागली होती. त्यातून किरकोळ वाद होत होते. मात्र त्यानंतर प्रकरण शांत होऊ लागले होते. त्यानंतर बांधकामाची भिंत उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर चौघांनी त्या ठिकाणी येऊन उदावंत यांना शिवीगाळ सुरु केली. तुझ्या बांधकामामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून ग्राहक कमी होत आहे. त्यामुळे तु बांधकाम करू नको असे म्हणत सराफा व्यापारी शुभम शहाणे, दिलीप शहाणे, वैभव शहाणे, देवेश शहाणे यांनी लोखंडी पंच लोखंडी मुसळ व लाकडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात वरील चौघांवर ता. २० मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना हिंगोलीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यामध्ये चारही आरोपींनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावेळी फिर्यादी सराफा व्यापारी उदावंत यांच्या वतीने ॲड. अविनाश बांगर व ॲड. हर्ष बनसोडे यांनी न्यायालयात युक्तीवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एेकल्यानंतर न्यायालयाने वरील चारही सराफा व्यापाऱ्यांचा जामीन फेटाळून लावला आहे.
