महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?:जुन्या ट्वीटची आठवण करून देत संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
![]()
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसारख्या संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी जनतेशी सत्य बोलण्याची शपथ घेतलेली असते. मात्र, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी सातत्याने जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “२०२३ मध्येच संसदेत नारी शक्ती अधिनियम मंजूर झाला आणि १६ एप्रिल रोजी त्याची अधिसूचनाही निघाली, मग आता पुन्हा या नावाचा डमरू वाजवून कोणाला फसवताय?” असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २० सप्टेंबर २०२३ च्या एका जुन्या ट्वीटचा संदर्भ दिला. “दीड वर्षांपूर्वी ज्या विधेयकाचे स्वागत फडणवीसांनी ‘ऐतिहासिक पाऊल’ म्हणून केले होते, त्याच मुद्द्यावरून आता पुन्हा आंदोलन किंवा निषेध करणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीसांनी आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आणि खोट्या प्रचाराबद्दल देशाची माफी मागावी,” अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली. हे आरक्षण नव्हे, तर मतदारसंघ तोडण्याचे बिल संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणत आहात, ते प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून मतदारसंघ तोडण्याचे बिल होते,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन खोटे बोलू नये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श न घेता किमान महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी सत्य मांडावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. अधिसूचना निघाली, मग आता कसला निषेध? १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने महिला आरक्षणच्या कायद्याची अधिसूचना काढून तो लागू केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. “३३ टक्के आरक्षण आता कायद्याने लागू झाले आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस कोणत्या भ्रूणहत्येबद्दल बोलत आहेत? राज्यात भ्रूणहत्येवर बंदी आहे हे ते विसरले का? २०२३ ला संसदेने कायदा मंजूर केला, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, मग आता कसला डमरू वाजवत आहात?” असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतील तफावत उघड केली. पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी यावेळी संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीसांनी २०२३ च्या ट्वीटबद्दल माफी मागायला हवी. मी त्यावेळी जे म्हटल आहे ते खोटं आहे. माझं ट्वीट खोटं आहे. त्यावेळी मोदींनीही संदेश दिला होता. मग तो संदेश खरा होता की काल दिलेला संदेश खरा होता,” असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय श्रेयावादाचा निषेध केला.
