काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवले गेले:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा मोठा दावा; राजकीय ‘गेमप्लॅन’चा आरोप
![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, मात्र काही राजकीय हालचालींमुळे तसे घडले नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून ही निवडणूक स्पर्धात्मक बनवली, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारण पुन्हा तापले असून विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे. पार्थ पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बारामतीत अनेकांची इच्छा होती की पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. काही उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मागे वेगवेगळ्या मागण्या असल्याचेही त्यांनी सूचित केले. काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवले गेले, असा त्यांचा आरोप आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या निवडणुकीतून माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत, असे सांगत त्यांनी विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचेही त्यांनी मान्य केले. सध्याच्या तीव्र उन्हामुळे प्रचार आणि मतदान प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सांगता सभेबाबतही पार्थ पवार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सभेची तयारी जोरात सुरू असून स्थळाची पाहणीही करण्यात येत आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांनी पुढे सांगितले की, सध्या बारामतीत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे मतदारांना घराबाहेर काढणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. तरीही कार्यकर्त्यांच्या मदतीने हे आव्हान पेलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उन्हातही लोकांना मतदानासाठी बाहेर काढणे हा मोठा टास्क आहे, पण आम्ही त्यासाठी तयारी केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय नव्हे तर मोठा विक्रम करण्याचे आमचे लक्ष्य विजयाबाबत बोलताना पार्थ पवार यांनी मोठा दावा केला. त्यांनी सांगितले की, आम्ही निश्चितपणे चांगल्या मतांनी विजयी होऊ. मात्र, केवळ विजय नव्हे तर मोठा विक्रम करण्याचे आमचे लक्ष्य आहे. यापूर्वीचा 2,70,000 मतांचा विक्रम मोडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे बारामतीतील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
