शिक्षण विभागातील अन्यायकारक निर्णयांविरोधात शिक्षक सेनेचा उद्रेक:शासनाविरोधात शिक्षण उपसंचालकांना दिले निवेदन : पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

0
240_177660008469e4c414f1670_shikshaksena.jpg




प्रतिनिधी | अमरावती शिक्षण विभागातील वाढत्या अनियमिततांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुढे आली असून शासनाविरोधात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड निदर्शनेही केली. ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे, कार्याध्यक्ष विनायक पवार आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शिक्षकांचे वेतन बंद ठेवणे, वर्षानुवर्षे थकित देयके न मंजूर करणे, शिक्षकांना निवडणुकीसह इतर अशैक्षणिक कामांमध्ये बळजबरीने ओढणे, परीक्षा काळात पटपडताळणीचे अव्यवहार्य आयोजन करणे आणि संचमान्यतेतील गंभीर त्रुटी आदी निर्णयांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनने एल्गार पुकारला आहे. सदर आंदोलन हे त्याच श्रृंखलेचा एक भाग होते. या आंदोलनाच्या माध्यमातून अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन, थकित देयकांचे वितरण, बी.एल.ओ. कामातून शिक्षकांची मुक्तता, परीक्षा काळातील पटपडताळणीला स्थगीती, त्रुटीग्रस्त संचमान्यता तातडीने निकाली काढणे, वेतनातील घोर विलंब थांबविणे, विना-अनुदानित शाळांना मुल्यांकनाची पुनश्च संधी तसेच विदर्भातील शाळा २६ जूननंतरच सुरु करण्याची मागणी करण्यात आली. राज्यात वाढत चाललेल्या प्रशासकीय दुर्लक्षावर टीका करत अध्यक्ष रूपेश टाले यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जिह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तापमानात होत असलेली तीव्र वाढ लक्षात घेता इतर जिल्ह्यांप्रमाणेच शाळेच्या वेळा बदलण्यात याव्यात, येत्या काही दिवसांत निकाल घोषित करावयाचा असल्याने इतर कामे थांबवून सध्या पेपर तपासणीसाठी वेळ द्यावा, शिक्षकांकडे आधी सोपविण्यात आलेली अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत आदी मागण्यांसाठी इतर संघटनांनीही प्रशासनाला साकडे घातले आहे. म. रा. प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, कपील पाटील यांच्या नेतृत्वातील शिक्षक भारती अशा इतर संघटनाही त्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks