भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात तिर्री गावात सहा महिन्यांच्या अद्वैतला घरातून उचलून नेणारा बिबट सोमवारी मध्यरात्रीनंतर पिंजऱ्यात अडकला. हा पिंजरा घटनेच्या घरापासून ३५० मीटर अंतरावर लावला होता. मात्र, पकडलेला बिबटच अद्वैतवर हल्ला करणारा आहे का, हे वनविभागाने अद्याप निश्चित केलेले नाही. १३ नोव्हेंबरच्या रात्री अभिमान बोंद्रे यांच्या घरात ही घटना घडली. कुटुंबीय घरात असताना बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या बालकाला उचलून नेले. आईने आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर बालकाचा मृतदेह आढळला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तिर्री आणि आसपास १२ ते १३ पिंजरे लावले. जंगल आणि शेतशिवाराची पाहणी तीन ड्रोनच्या मदतीने केली. बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरेही लावले. पवनी, भंडारा आणि नवेगाव-नागझिरा येथील बचाव पथकांसह सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचारी शोधमोहीमेत सहभागी झाले. संभाव्य मार्गांवर लक्ष ठेवून पिंजरे लावण्यात आले. अखेर घटनास्थळाजवळच्या पिंजऱ्यात बिबट अडकला. पकडलेला बिबट नर असून त्याचे वय अंदाजे १८ ते २० महिने आहे. वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षणासाठी त्याला नागपूरच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात हलवले आहे. तपासणीनंतर तोच अद्वैतवर हल्ला करणारा बिबट आहे का, हे स्पष्ट होईल. सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शोधमोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. बिबट पकडला असला तरी परिसरात गस्त आणि नागरिकांना सतर्क करण्याचे काम सुरू राहणार आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 16 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक:स्टेटसवर 12 हून अधिक अश्लील व्हिडीओ अपलोड, हॅकरचा शोध सुरू सरकारी पोर्टलवरील माहितीने सरपंचांना ब्लॅकमेल केले:भोपाळमध्ये तीन बनावट कॉल सेंटर; 35 महिलांपैकी चार अटकेत