नांदेडमध्ये बनावट पोलीस बनून वृद्धाची 92 हजारांची फसवणूक
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास बियाणी पार्क पाटीजवळ, कौठा (ता. जि. नांदेड) येथे ही घटना घडली. अनोळखी आरोपीने फिर्यादीला आपण पोलीस असल्याचे सांगत परिसरात दंगल झाल्याचे खोटे कारण दिले. त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव फिर्यादीकडील सोन्याचे दागिने कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले.फिर्यादीने विश्वास ठेवून सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील लॉकेट (एकूण किंमत सुमारे 92 हजार रुपये) काढून दिले. आरोपीने चलाखीने पुडी बदलून बनावट पुडी फिर्यादीच्या हातात दिली. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी श्यामसुंदर नथमलजी लड्डा (वय 71, रा. घोडबंदर रोड वडवळी, ठाणे पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 417/2026 नुसार भा.दं.वि. कलम 318(4), 204, 319(2) तसेच बीएनएस-2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे करीत आहेत.
सावध राहा
पोलीस असल्याचे सांगून कोणीही मौल्यवान वस्तू मागितल्यास तत्काळ खात्री करूनच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
