रूपाली ठोंबरे विधान परिषदेसाठी इच्छुक:सक्षम, अभ्यासू व लढाऊ महिला प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे मागणी

0
new-project-2026-04-19t153320891_1776593033.jpg




राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे. माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे. मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या नेहमीच मीडियामध्ये सक्रिय असतात. सध्या महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, रूपाली पाटील यांनी थेट उमेदवारीची मागणी केल्यामुळे पुणे राष्ट्रवादीत आता कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “माझ्या कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी,” अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी रूपाली पाटील यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतात आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks