तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन:म्हाडाच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या रहिवाशालाच अधिकाऱ्यांची दमदाटी
![]()
गोरेगाव पश्चिम येथील ऐतिहासिक मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाचा म्हाडाचा मास्टर प्लॅन सादर होत असताना, म्हाडा अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी भरसभेत “तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन” अशी धमकी दिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) नुकताच गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर केला, ज्याअंतर्गत ३,७०० हून अधिक कुटुंबांना १,६०० चौरस फूट (रेरा कार्पेट एरिया) क्षेत्रफळाची घरे मिळणार आहेत. म्हाडाने मोतीलाल नगर पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर करण्यासाठी रहिवाशांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात एक स्थानिक रहिवासी शांततेने आणि संविधानिक अधिकारानुसार आपली मागणी मांडत होता. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्याने त्याला दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत नेमके काय? गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे म्हाडाचा पुर्नवसन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका स्थानिकाने आपल्या हातात पोस्टर घेऊन आपली मागणी मांडत प्रकल्पाला विरोध दर्शवला. पण म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यालाच धमकावले. तरुणाने आपले प्रश्न मांडताच, तुम्हाला मराठी येत नाही का? अशी विचारणा म्हाडाचे सीईओ संजय जयस्वाल यांनी केली. त्यावर मला मराठी येत नसल्याचे तरुणाने सांगितले. यानंतर जयस्वाल यांनी तरुणाला खाली बसण्यास सांगितले. तरुण खाली बसल्यानंतर, त्या माणसाचे ओळख पत्र माझ्याकडे आणून द्या. अशा सूचना पोलिसांना केल्या. जयस्वाल त्या तरुणाला म्हणाले, तुझे आयकार्ड आम्हाला द्या. तुझी शहानिशा मी करतो. कुठून आला? कधी आला? कोणत्या वर्षी आला? येथे जन्म झालाय की नाही? ही सर्व माहिती मी काढतो. तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळवतो. जर तू घुसखोर निघालास, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, अशा भाषेत दमदाटी केली. अधिकाऱ्यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली हा प्रकार झाल्यानंतर तुमचा इथे संवाद करण्याची इच्छा नाहीये. तुमची पुर्नवसनसाठी इच्छा नाहीये. याच कारणामुळे मी सभा संपवतोय, असे म्हणून संजय जयस्वाल यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली आणि तिथून निघून गेले. आपल्या हक्कांची मागणी करणे गुन्हा आहे का? दरम्यान, शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का? भारतासारख्या लोकशाही देशात, नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही, तर हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे. ५०+ वर्षांपासून येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवाल नागरिकांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? रहिवाशांनी यापूर्वीही अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवली आहे. आजही त्यांची मागणी एकच आहे न्याय्य, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक पुनर्विकास. शेजारील प्रकल्पांमध्ये (उदा. पत्रा चाळ, उन्नत नगर) जे अनुभव आले जसे की उशीर, विस्थापन, असमान फायदे त्यातून धडा घेणे आवश्यक आहे. मग मोतीलाल नगरच्या रहिवाशांना समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? पुनर्विकास हा लोकांसाठी असतो, लोकांवर लादण्यासाठी नाही. रहिवाशांचा सहभाग, विश्वास आणि सन्मान हाच कोणत्याही प्रकल्पाचा पाया असायला हवा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोकशाही फक्त कागदावरच का? आम्ही राज्य सरकार आणि संबंधित सर्व निर्णयकर्त्यांना विनंती करतो की, रहिवाशांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि एक सकारात्मक, विश्वासार्ह वातावरण निर्माण करावं. लोकशाही फक्त कागदावर नसावी. ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
