रागदारबार:'दीदी तुझा सूर चुकला' असे लता मंगेशकरांना सांगणाऱ्या.. सगळ्याच जॉनरमध्ये गाणाऱ्या.. चिरतरुण स्वरांचा झंझावात- आशा भोसले

0
untitled-design-12_1776545344.jpg




देह पंचतत्वात विलीन होतो, पण काही दैवी सूर अवकाशात कायमचे रेंगाळत राहतात. दूरवर, प्रदीर्घ काळासाठी आणि कधीकधी तर युगायुगांसाठी. ‘नया दौर’मधील तो साधेपणा, ‘तीसरी मंज़िल’मधील विद्युलतेसारखी चपळता, ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील पाश्चात्य ढब, ‘उमराव जान’ची ती अवीट नजाकत, ‘इजाज़त’मधील व्याकुळ भावूकता आणि ‘रंगीला’मधील तो बेधुंद तारुण्यातला उत्साह… काळ बदलला, पिढ्यानपिढ्यांची परंपरा बदलली आणि पडद्यावरच्या नायिकांची रूपेही पालटली. मात्र, या सार्‍या स्थित्यंतरात आशा भोसले यांचा तो मंत्रमुग्ध करणारा, उत्स्फूर्त आणि मखमली आवाज नेहमीच चिरतरुण आणि चैतन्यमयी राहिला. काळाच्या ओघात सगळे काही धूसर होते, पण आशाताईंच्या स्वरांनी सजलेली ही स्वरगाथा मात्र सदाबहार आणि अविस्मरणीय आहे. असे असले तरी त्यांच्या गायकीच्या कौतुकासोबतच त्यांच्या संघर्षाचा सुद्धा उल्लेख नेहमीच केला जातो. रागदरबारच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्याविषयी. ज्यांच्या आवाजाने केवळ मोठ्यांनाच नाही, तर त्या काळातल्या तरुणाईलाही अक्षरशः वेड लावले होते. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. संगीताशी त्यांचे नाते त्यांच्या जन्मापासूनच होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि मराठी संगीत रंगभूमीवरचे एक दिग्गज कलाकार होते. त्यांच्या घरात लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या पाच भावंडांच्या रूपात सप्तसुरांचे चैतन्य बालपणापासूनच नांदत होते. त्या कोवळ्या वयात लता आणि आशाची जोडी अविभाज्य होती. मोठी बहीण जिथे जाईल, तिथे छोटी आशा तिची सावली होऊन अगदी मागे-मागे असायची. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आशा केवळ 9 वर्षांच्या असतानाच त्यांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनामुळे सुखी-समाधानी असलेल्या मंगेशकर कुटुंबावर आर्थिक विवंचनेचं आणि संकटाचे काळे ढग दाटून आले. उदरनिर्वाहाच्या शोधात मंगेशकर कुटुंब पुणे, कोल्हापूर असा प्रवास करत 1945 मध्ये मुंबईच्या धकाधकीच्या मायानगरीत दाखल झाले. तिथे अवघ्या 14 वर्षांच्या लतादीदींनी आपल्या कोवळ्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि चित्रपटसृष्टीच्या अनिश्चित व काट्याकुट्यांच्या वाटेवर आपला अहोरात्र संघर्ष सुरू केला. लवकरच, आपल्या मोठ्या बहिणीला साथ देण्यासाठी आशादेखील या तप्त संघर्षाच्या रणांगणात हिरिरीने उतरल्या. लतादीदींच्या सावलीतून स्वतःच्या अस्तित्वाकडे वाटचाल आपल्याला हे मान्यच करावे लागेल की, विलक्षण प्रतिभा आणि अफाट कसब असूनही, आशा भोसले यांना प्रदीर्घ काळ दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावरच समाधान मानावे लागले. कारण त्यांच्या समोर ‘नंबर एक’च्या सिंहासनावर त्यांच्या थोरल्या भगिनी, साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर नावाचे एक विराट आणि अविचल व्यक्तिमत्व उभे होते. हिंदी पार्श्वगायनाच्या क्षितिजावर जेव्हा ‘लता मंगेशकर’ नावाचा सूर्य आपल्या तेजस्वी प्रकाशाने अवघे विश्व उजळून टाकत होता, तेव्हा त्या प्रकाशात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची आशाताईंसमोर एक मोठे आव्हान होते. परंतु, आपल्या अदम्य चिकाटीच्या आणि अद्वितीय प्रतिभेच्या बळावर, आशा भोसले लता मंगेशकर यांच्या सावलीतून धैर्याने बाहेर पडल्या. त्यांनी केवळ स्वतःला सिद्धच केले नाही, तर संगीताच्या अथांग विश्वात स्वतःचे एक स्वतंत्र, दैदीप्यमान आकाश निर्माण करून दाखवले. हा प्रवासही काही सोपा नव्हता. पहिल्या गाण्याचा किस्सा.. जेव्हा माइक सोडून पळून जावे वाटले.. एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याचा किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, “1943 साली कोल्हापुरात वयाच्या 10 व्या वर्षी मी पहिले गाणे गायले. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी अक्षरशः थरथर कापत होते. असे वाटले की हा माईक सोडून पळून जावे. पण, जर पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारले असते, या एकाच भीतीपोटी मी तिथे गायले.” जर तेव्हा आशाताईंनी भीतीपोटी गाणे गायले नसते, तर आज त्यांचे सूर अजरामर कदाचित झाले नसते. त्यानंतर आशाताईंना याच साली म्हणजे 1943 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाला’ या गाण्याने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षातच आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट विश्वात प्रवेश केला. 1948 साली ‘चुनरिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट पार्श्वगायनाच्या विशाल क्षितिजावर आपले पहिले पाऊल ठेवले आणि गीता दत्त व शमशाद बेगम यांसारख्या स्थापित गायिकांच्या साथीने ‘सावन आया रे’ या गाण्यातून आपला मधुर स्वर रसिकांच्या दरबारी पोहोचवला. या यशस्वी पदार्पणानंतर अवघ्या एकाच वर्षात, म्हणजे 1949 मध्ये, ‘रात की रानी’ या चित्रपटामुळे त्यांना आपले पहिले स्वतंत्र आणि लखलखीत सोलो गीत गाण्याची सुवर्णसंधी लाभली, जिथून त्यांच्या एका अलौकिक आणि अविस्मरणीय सांगीतिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. आशा भोसलेंच्या शब्दोच्चारांवरही झाली होती टीका आशा भोसले यांच्यासमोर सर्वात मोठे अग्निदिव्य होते ते म्हणजे मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या प्रभावाखाली स्वतःचे एक स्वतंत्र आणि मौलिक अस्तित्व निर्माण करणे. कारण त्याकाळी लता मंगेशकर यशाच्या उत्तुंग आणि अभेद्य शिखरावर विराजमान होत्या. सुरुवातीच्या काळात आशाजींच्या वाट्याला केवळ दुय्यम दर्जाचे चित्रपट किंवा प्रस्थापित गायिकांनी नाकारलेली गाणी येत असत, इतकेच नव्हे तर त्यांच्या शब्दोच्चारांवरही टीकेची झोड उठवली जात होती, मात्र आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि अचल जिद्दीच्या जोरावर त्यांनी कधीही हार मानली नाही. आशाजींना इतर समकालीनांपेक्षा अद्वितीय ठरवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध आणि अस्सल सांस्कृतिक गाभा जागतिक संगीतपटलावर अत्यंत दिमाखात पोहोचवण्याचे त्यांचे विलक्षण कसब. मग ते मराठी भावगीतांमधील गूढ आर्तता असो वा हिंदी चित्रपटगीतांमधील बेधुंद ऊर्जा, त्यांच्या गळ्यातील प्रत्येक स्वर ही त्यांची ओळख बनली. तगड्या स्पर्धेत आशाजींचे नाव कुठे दूरवरही नसायचे चित्रपट इतिहासकार राजू भारतन यांनी आशा भोसले यांच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाचे वास्तव मांडताना म्हटले होते की, “प्रारंभीच्या काळात आशा भोसले म्हणजे काही चमत्कारी जादू नव्हती, तर त्या एक सामान्य ‘स्ट्रगलर’ होत्या. निर्मात्यांना जर लतादीदींची साथ लाभली नाही, तर त्यांची पुढची पसंती गीता दत्त किंवा शमशाद बेगम असायची. त्या तगड्या स्पर्धेत आशाजींचे नाव कुठे दूरवरही नसायचे.” पुढे राजू भारतन सांगता की, “अशा परिस्थितीत, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आशाजींच्या वाट्याला जे काही काम आले, ते त्यांनी अखंड जिद्दीने स्वीकारले. त्यांच्यासमोर भाषेचीही एक मोठी अडचण होती. त्यांच्या हिंदीत ‘मराठी भाषेचा लहेजा’ अधिक जाणवायचा आणि उर्दू शब्दोच्चारांवर त्यांनी लतादीदींसारखे प्रभावी काम केले नव्हते. या व्यावसायिक मर्यादांसोबतच, त्यांचे खासगी आयुष्य आणि वैवाहिक जीवन कमालीच्या वादळांनी, संघर्षाने आणि कटू अनुभवांनी वेढलेले होते.” वयाच्या 16 व्या वर्षीच 31 वर्षांच्या गणपतराव भोसलेंशी लग्न वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आशाजींनी एका अविचारी निर्णयापोटी घर सोडले आणि 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या या धाडसी पावलामुळे दोन बहिणींच्या नात्यात एक दुर्दैवी दरी निर्माण झाली, जी पुढे कित्येक वर्षे सांधली गेली नाही. लतादीदींना हे नाते आपल्या धाकट्या बहिणीसाठी योग्य वाटत नव्हते. खुद्द आशाताईंनीच एका मुलाखतीत कबूल केले होते की, त्यांच्यातील संबंध इतके विषारी झाले होते की अनेक वर्षे त्यांच्यात संवादही उरला नव्हता. गणपतरावांसोबतचा तो संसार म्हणजे आशाजींच्या आयुष्यातील एक भीषण शोकांतिका ठरली. ते एक अत्यंत रूढीवादी कुटुंब होते, ज्यांना पडद्यावर चमकणारी ‘सिंगिंग स्टार’ सून म्हणून मुळीच मान्य नव्हती. आशाजींच्या पतीचा स्वभाव अत्यंत तापट आणि संशयी होता. कदाचित इतरांना वेदना देण्यात त्यांना एक विकृत आनंद मिळत असे, मात्र घराबाहेर कोणालाही याची पुसटशी कल्पना नसायची. या मानसिक कोंडमारे आणि घरगुती छळामुळे आशाजींचे करिअर संथ गतीने चालले होते. आशा भोसलेंच्या जीवनप्रवासला वळण देणारे ओ.पी. नैय्यर आशाजींच्या कारकिर्दीला बिमल रॉय यांच्या ‘परिणीता’ (1953) आणि राज कपूर यांच्या ‘बूट पॉलिश’ (1954) मधील गाण्यांनी एक आश्वासक बळ दिले. मात्र, त्यांच्या जीवनप्रवासाला खरे निर्णायक आणि क्रांतिकारी वळण मिळाले ते दिग्गज संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या भेटीमुळे. लतादीदींच्या अनुपस्थितीतही संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकते, असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या नैय्यर यांनी ‘सी.आय.डी.’ नंतर आशाजींना आपल्या संगीतात अढळ स्थान दिले. त्यांनी आशाजींच्या आवाजातील खालच्या सुरांची गूढ खोली आणि त्यातील मादकता अचूक ओळखली. ‘नया दौर’ (1957) मधील ‘उडे जब-जब जुल्फें तेरी’ आणि ‘मांग के साथ तुम्हारा’ सारख्या धुंद गीतांनी इतिहास रचला आणि आशाजी पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य नायिकेचा खणखणीत आवाज बनून बी.आर. चोप्रांसारख्या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेचा अविभाज्य भाग बनल्या. दोन बहीणीत काहीशी कटुता.. त्याच सुमारास (1957), महान संगीतकार एस.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील तात्पुरत्या वितुष्टामुळे आशाजींसाठी यशाची नवी कवाडे उघडली गेली. पुढील पाच वर्षे जेव्हा बर्मनदांनी लतादीदींसोबत काम करणे थांबवले, तेव्हा आशाजी त्यांच्या गोटातील प्रमुख आणि अपरिहार्य गायिका म्हणून उदयास आल्या. या काळात दोन बहिणींमधील नात्यात काहीशी कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा सिनेसृष्टीत चवीने चर्चिल्या गेल्या, परंतु याच संघर्षातून आशाजींनी आपल्या अद्वितीय प्रतिभेचे लोह साऱ्या जगाला मानायला लावले. एस.डी. बर्मन, किशोर कुमार, आशा भोसले आणि मजरूह सुलतानपुरी या दिग्गज चौकडीने रोमँटिक आणि मिश्किल गीतांचे एक नवे पर्व सुरू केले. ‘हाल कैसा है जनाब का’ आणि ‘छोड दो आंचल’ सारखी अवीट आणि सदाबहार गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. विशेष म्हणजे, बर्मनदांनी आशाजींच्या आवाजाला केवळ चपळ आणि चुलबुल्या गाण्यांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्यांच्या आवाजातील भावविवशतेला आणि गांभीर्याला अत्यंत कौशल्याने पैलू पाडले. ‘काला पानी’ चित्रपटात जिथे ‘अच्छा जी मैं हारी’ सारखे छेलछबेले रोमँटिक गाणे होते, तिथेच ‘नजर लगी राजा तोरे बंगले पर’ सारखी शास्त्रीय नजाकत असलेली ठुमरीही त्यांनी आशाजींकडून तितक्याच समर्थपणे गाऊन घेतली. तर दुसरीकडे ‘सुजाता’ आणि ‘लाजवंती’ सारख्या चित्रपटांमधून अत्यंत संजीदा, मर्मभेदी आणि आर्त सुरांचा आविष्कार घडवून, आशाजी संगीताच्या प्रत्येक रंगात लीलया संचार करू शकतात, हे त्यांनी निक्षून सिद्ध केले. आशा भोसलेंना मिळायचे केवळ 100-150 रुपये मानधन आशा भोसले आणि ओ.पी. नैय्यर या जोडीने चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात 60 चित्रपटांतून तब्बल 324 गीतांचा विक्रमी टप्पा गाठला. म्हणजे सरासरी प्रत्येक चित्रपटात पाच गाणी. मात्र, इतकी लोकप्रिय आणि अजरामर गाणी देऊनही, संगीताच्या जगातील सर्व मुख्य रस्ते लतादीदींच्या अविचल साम्राज्यातूनच जात होते. आशाजींनी कष्टाने आपली जमीन तर सुपीक केली होती, पण हिंदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रावर लता मंगेशकर यांचे एकछत्र आणि अभेद्य वर्चस्व कायम होते. राजू भारतन यांच्या नोंदीनुसार, 50-60 च्या दशकात मानधनामध्येही धक्कादायक तफावत होती, जिथे लतादीदी एका गाण्यासाठी 500 रुपये घेत, तिथे आशाजींना अवघ्या 100-150 रुपयांत समाधान मानावे लागे. लतादीदींकडे गाण्याची आणि संगीतकाराची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते, तर आशाजींकडे असा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. ही दुजाभावाची वागणूक आशाताईंच्या मनात एखाद्या शल्यासारखी टोचत होती. मात्र, या उपेक्षेला हतबल न होता त्यांनी एका बंडखोर आव्हानासारखे स्वीकारले आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. दोन बहिणींमधील हा सांगीतिक संघर्ष, त्यातील ईर्षा आणि दुरावा इतका गाजला की, प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी 1997 मधील ‘साज’ या चित्रपटातून याच नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे आणि भावनिक पदर मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे रेखाटले, असे मानले जाते. ‘ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली’ मधील ती वादळी लय एस.डी. बर्मन यांच्याकडे काम करत असतानाच आशा भोसले यांची भेट त्यांचे सुपुत्र आर.डी. बर्मन ऊर्फ ‘पंचम’ यांच्याशी झाली. वडिलांचा भव्य वारसा पाठीशी असूनही पंचम आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते. 1966 मध्ये नासिर हुसैन यांच्या ‘तीसरी मंज़िल’ या चित्रपटाने या जोडीच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात झाली आणि येथूनच एका अशा सर्जनशील आणि रूमानी युगाचा पाया रचला गेला, ज्याने हिंदी चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला. एका बाजूला ‘ओ मेरे सोना रे’ मधील मखमली गोडवा होता, तर दुसरीकडे ‘ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली’ मधील ती वादळी लय होती. या गाण्यात आशाताईंनी आपल्या श्वासांवर जे विस्मयकारक नियंत्रण मिळवून सुरांशी खेळ केला, ते पाहून अवघ्या संगीत विश्वाच्या भुवया उंचावल्या. आर.डी. बर्मन जेव्हा या क्षेत्रात आले, तेव्हा त्यांच्या मनात जागतिक संगीताचा अथांग साठा होता. त्यांना हिंदी सिनेसृष्टीत फंक, जॅझ, कॅबरे आणि रॉक-एन-रोल यांसारख्या धाडसी पाश्चात्य शैलींचा प्रयोग करायचा होता. या क्लिष्ट आणि आव्हानात्मक धुनांना न्याय देण्यासाठी त्यांना अशा आवाजाची गरज होती जो कमालीचा लवचिक असेल आणि ज्यामध्ये धोके पत्करण्याचे अदम्य धाडस असेल. आशा भोसले हाच तो परिपूर्ण आवाज ठरल्या. पंचम यांनी त्यांच्या संगीतात पाश्चात्य मिजास ओतली, तर आशाजींच्या स्वरांनी त्या संगीताला एक निर्भीड आकर्षण आणि मुक्त विचारांचे नवे जिवंत रंग मिळवून दिले. पंचम यांची नजर केवळ धुंद संगीतापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आशाजींच्या आवाजाची ती विशाल व्याप्तीही ओळखली होती, जी तोपर्यंत जगासाठी अस्पर्शित होती. एकीकडे ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘दम मारो दम’ सारख्या गाण्यांनी आशाजींना ‘कॅबरे क्वीन’ किंवा आधुनिक ‘वेस्टर्न वाइब’ असलेल्या गायिका म्हणून ओळख मिळवून दिली, तर दुसरीकडे ‘इजाज़त’ (1987) मधील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘खाली हाथ शाम आई है’ सारख्या गीतांतून या जोडीने शब्दांतील मूक वेदना आणि कातरता किती सात्विकतेने मांडता येते, याचे उत्तम उदाहरण दिले. विशेषतः ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यात आशाजींनी ती गद्यमय कविता ज्या रूहानी आणि विलक्षण पद्धतीने गायली, ती आजही गायकीच्या क्षेत्रातील एक पवित्र आणि आदर्श पाठशाळा मानली जाते. कॅबरेची चपळाई, गझलेचा ठहराव आणि शास्त्रीय संगीताची गुंतागुंत या प्रत्येक साच्यात स्वतःला लीलया ढळणाऱ्या आशाताईंच्या या बहुरूपी स्वरांची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नाही.. ‘मेरा कुछ सामान’ या गाण्याचा रंजक किस्सा 1987 मधील ‘इजाजत’ या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ हे गाणे म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील एक विलक्षण आणि प्रयोगशील चमत्कार मानला जातो, ज्याच्या निर्मितीचा किस्साही तितकाच रोचक आहे. जेव्हा गुलजार यांनी या गाण्याचे अलंकारिक परंतु मुक्तछंदातील बोल आर.डी. बर्मन (पंचमदा) यांच्यासमोर ठेवले, तेव्हा त्यातील शब्दांची लांबी पाहून पंचमदा काहीसे अस्वस्थ झाले आणि आपल्या विशिष्ट मिश्किल शैलीत बंगालीत टिप्पणी केली की, “पुढच्या वेळी येताना वर्तमानपत्रातील एखादी बातमीच घेऊन ये, मी तिलाही चाल लावून देईन, कारण हे गाणं नसून एखाद्या खासगी पत्रासारखं वाटतंय!”; मात्र तिथेच उपस्थित असलेल्या आशाताईंनी त्या शब्दांमधील अथांग व्याकुळता आणि भावसौंदर्य क्षणात ओळखून ते शब्द मनातल्या मनात गुणगुणायला सुरुवात केली. आशाजींच्या त्या अवीट स्वरांनी पंचमदांना अशी काही जादुई प्रेरणा दिली की, अवघ्या दहा मिनिटांत एक अविस्मरणीय आणि अजरामर धून साकारली गेली. या गाण्याने पुढे इतिहास रचला आणि आशाताईंच्या मर्मभेदी आवाजाला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा’ तर गुलजार यांच्या समृद्ध लेखणीला ‘सर्वोत्कृष्ट गीतकाराचा’ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. दीदी तुझे सूर चुकले.. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या नात्यात काही काळासाठी कटुता जरी आली असली, तरी दोघींमधील बहिणीचे नाते फार वेगळे होते. एका कार्यक्रमात आशाताईंनी दीदीबद्दल एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “मी आणि दीदी रेकॉर्डिंगला अतिशय संध्या साड्या आणि काचेच्या बांगड्या घालून जायचो, कारण आमचे चित्त केवळ सुरांवर असायचे. पुढे त्या म्हणाल्या, 10 वर्षांपूर्वी माझ्या दीदीने एक गाणे गायले होते. त्यावेळी मी दीदीला म्हणाले की, दीदी तुझा आवाज ठीक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्चे वाटत आहेत. त्यावेळी दीदी म्हणाल्या, ‘अच्छा, असंय? तुला जास्त माहिती आहे..’ दुसऱ्या दिवशी लतादीदी सकाळी सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्या आणि त्यानंतर तेच गाणे मला पुन्हा गाऊन दाखवले. त्यांचा हा रियाज म्हणजे संगीतप्रती असलेले समर्पण.” ‘उमराव जान’साठी कठोर रियाज हिंदी चित्रपटसृष्टीत गझल म्हणजे केवळ लता मंगेशकर असे समीकरण असताना, मुजफ्फर अलींच्या ‘उमराव जान’साठी संगीतकार खय्याम यांच्यासमोर ‘पाकीजा’सारख्या महान आणि अजरामर वारशापुढे एक नवी रेघ ओढण्याचे मोठे आव्हान होते. खय्याम यांनी एक साहसी आणि क्रांतीकारी निर्णय घेत या चित्रपटासाठी आशा भोसले यांची निवड केली, पण त्यासोबत एक अटही घातली, ती म्हणजे, “आम्हाला या गाण्यांमध्ये ‘आशा’ नकोय.” त्यांचा स्पष्ट संकेत होता की, आशाजींनी आपली चिरपरिचित चपळाई, शोखपणा आणि चुलबुलपणा बाजूला सारून एका प्रगल्भ शास्त्रीय बैठकीच्या गायकीचा अंगीकार करावा. खय्याम यांची अशी इच्छा होती की आशाजींनी आपला मूळ स्वर ‘दीड पट्टी’ खाली नेऊन गावे. इतक्या खालच्या स्वरात गाणे आशाजींसाठी पूर्णपणे अपरिचित आणि आव्हानात्मक होते. सलग 8 दिवसांच्या अथक आणि खडतर रियाजानंतर जेव्हा प्रत्यक्ष रेकॉर्डिंगला सुरुवात झाली, तेव्हा एक क्षण असा आला की जिथे आशाजींची हिंमत डळमळीत झाली. त्यांना वाटले की आपण हे गाऊ शकणार नाही. मात्र, जेव्हा रेकॉर्डिंग पूर्ण झाले आणि आशाजींनी स्वतःचाच तो मखमली आवाज ऐकला, तेव्हा त्या स्वतः थक्क झाल्या. ‘दिल चीज़ क्या है’, ‘इन आंखों की मस्ती के’ आणि ‘ये क्या जगह है दोस्तों’ यांसारख्या कालजयी गझलांनी जगाला आशाजींच्या आवाजातील तो गंभीर, आर्त आणि अत्यंत अभिजात पैलू दाखवला, ज्यापासून आतापर्यंत रसिक पूर्णपणे अनभिज्ञ होते. या अपूर्व प्रयोगाचा निकाल इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला, ‘उमराव जान’साठी खय्याम आणि आशा भोसले या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळानुसार बदलत गेलेल्या आशाताई काळाचे चक्र फिरत राहिले, संगीताचे साज आणि तंत्रज्ञान बदलले, पण आशाजींच्या आवाजातील चैतन्य आणि ऊर्जा तसूभरही कमी झाली नाही. पुढील वर्षांत ए.आर. रहमान यांच्यासोबत ‘रंगीला’, ‘लगान’ आणि ‘ताल’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, त्यांच्या सुरांवर वाढत्या वयाची कोणतीही बंधनं नाहीत. ज्या काळात त्यांच्या पिढीतील अनेक गायक संगीताच्या बदलत्या स्वरूपाबद्दल आणि ‘रिमिक्स’ संस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त करत होते, तिथे आशाजींनी मात्र मोठ्या मनाने या नव्या युगाचा उत्साहाने स्वीकार केला. त्यांनी स्वतः आपल्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स अल्बम काढले आणि नव्या पिढीला त्या जादुई आणि मोहिनी घालणाऱ्या संगीताची नव्याने ओळख करून दिली. आशा भोसले यांचा हा संपूर्ण प्रवास काट्याकुट्यांनी भरलेला होता. स्वतःच्याच थोरल्या बहिणीच्या विराट आणि वटवृक्षासारख्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, पण सरतेशेवटी त्यांच्या बंडखोर जिद्दीचा विजय झाला. त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की त्या प्रत्येक रंगात, प्रत्येक भावनेत लीलया मिसळून जाणाऱ्या एक परिपूर्ण कलाकार आहेत. आशाजी म्हणजे एक असा दैवी आवाज आहे, जो कालही तितकाच चिरतरुण होता आणि ज्याची भुरळ पडणारा मोहकपणा प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या मनाला अखंड साद घालत राहील..

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks