अक्षय्य तृतीयेला अमरावतीत 60 कुटुंबांचा गृहप्रवेश:शंभरावर चारचाकींची डिलिव्हरी; सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठी खरेदी

0
1ef52d18-83e9-4b6a-bde1-68fcc858a978_1776527867266.jpg




वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सध्याची भाववाढ आणि इतर बाबींचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, उलट गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर शहरातील सुमारे ६० कुटुंबे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काही नागरिकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून, तर काहींनी गरजेपोटी सोने-चांदी आणि डायमंड ज्वेलरीला पसंती दिली. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही अशीच स्थिती होती. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे अनेक खरेदीदारांचे मत होते. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे सर्व नामांकित ब्रँड्स उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा शोरूम्सकडे होता. क्रेडाई, अमरावतीचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याला मुहूर्ताची जोड दिली जाते. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी घरांसाठी बुकिंग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी व्यवहार पूर्ण केले असून, ते अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणतः तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीबद्दल बोलताना दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) चे संचालक निलेश साबू म्हणाले की, गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी खरेदी केली. बुकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. पीएनजी, अमरावतीचे सेल्स हेड बापूसाहेब कारवाड यांनी सांगितले की, अक्षय्य तृतीया हा शुभमुहूर्त असल्याने सोन्याचे दागिने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. सोने हे अलीकडच्या काळातील सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks