काँग्रेसचे 'सृजन अभियान' चांदूरबाजार, तिवस्यात; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड:आमदार भाई जगताप व आफताब अहमद निरीक्षक म्हणून उपस्थित
![]()
काँग्रेसने शहर आणि जिल्हा स्तरावर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत चांदूरबाजार आणि तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद आणि प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप यांनी निरीक्षक म्हणून या सभांना उपस्थिती लावली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शहर आणि जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी कोण योग्य आहे, याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच, काँग्रेसला गावपातळीवर मजबूत करण्यासाठी जनतेत कोणते मुद्दे घेऊन जावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील चांदूरबाजार येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे, संजय खाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या कांचनमाला गावंडे, वासंतीताई मंगरोळे, अता शाह, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, राहुल गवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावान काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेला अधिक बळकट करण्यावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती गतिमान करण्यावर भर देण्यात आला. बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले की, “संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून काँग्रेसला पुन्हा जनतेच्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे.” तिवसा येथेही निरीक्षक आफताब अहमद, आमदार भाई जगताप, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय दुबे आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व कार्यकर्त्यांच्या मुलाखती पार पडल्या. तिवसा तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वैभव वानखडे यांच्या पुनर्निवडीचा ठराव मांडण्यात आला आणि कडक ऊन असतानाही ग्रामीण भागातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.
