DA Hike | केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला
DA Hike | केंद्र सरकारने (Central Government) दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार डीएमध्ये २ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, तो आता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.
शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) या वाढीस हिरवा कंदील दिला. यामुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार असली तरी अपेक्षेप्रमाणे मोठा फायदा होणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी संघटना वेतनात मोठ्या सुधारणांची मागणी करत होत्या.
महागाई भत्त्याच्या वाढीचा निर्णय यावेळी नेहमीपेक्षा उशिरा घेण्यात आला आहे. साधारणपणे जानेवारी ते जून या कालावधीसाठी डीएची घोषणा मार्चमध्ये केली जाते, मात्र यंदा एप्रिलमध्ये निर्णय जाहीर झाला. मागील वेळेस ऑक्टोबरमध्ये डीए ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला होता, जो जुलै २०२५ पासून लागू झाला होता.
DA Hike | ८व्या वेतन आयोगाची मागणी कायम:
कर्मचारी संघटनांकडून आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) सातत्याने मागणी होत आहे. त्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव अमलात आल्यास किमान वेतन १८ हजारांवरून थेट ६९ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महागाई भत्त्यातील २ टक्के वाढीचा परिणाम वेगवेगळ्या वेतन श्रेणींवर वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येणार आहे. उदाहरणार्थ, १८,००० रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुमारे ३६० रुपयांची मासिक वाढ मिळेल. २९,२०० रुपये बेसिक वेतन असणाऱ्यांना सुमारे ५८४ रुपये अधिक मिळतील. ५६,१०० रुपये पगार असणाऱ्यांचा फायदा १,१०० रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, तर २,५०,००० रुपये बेसिक असणाऱ्यांना सुमारे ५,००० रुपयांची वाढ मिळू शकते.
