नांदेड पोलिसांची मोठी कारवाई : ४६.०३ लाखांचे ३०३ हरवलेले मोबाईल हस्तगत
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. जानेवारी २०२६ पासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणांहून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल आज एकत्रितरीत्या नागरिकांना परत करण्यात आले. या उपक्रमात मिशन सहयोग आणि मिशन समाधान अंतर्गत पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले. तसेच, शोधलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक नांदेड पोलिसांच्या अधिकृत “Nanded Police” फेसबुक पेजवर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
याचबरोबर, सन २०२५ दरम्यानही नांदेड पोलिसांनी सुमारे ८०० मोबाईल (अंदाजे १ कोटी ३७ लाख रुपये किंमतीचे) हस्तगत केल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी नागरिकांनी CEIR पोर्टलवर माहिती नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
