5.98 लाखांच्या बक्षीसांसह राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा:पुण्यात 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान; विक्रमी खेळाडूंचा सहभाग
![]()
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 5 लाख 98 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस आणि पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वैयक्तिक गटात 1195, सांघिक गटात 197 आणि दुहेरी गटात 834 खेळाडूंचा समावेश असून, याला विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. केवळ महाराष्ट्रातून 300 हून अधिक वैयक्तिक प्रवेशिका आल्या असून, 30 संघ आणि 166 दुहेरी जोड्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सचिव), महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपणीस आणि स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शारदा ग्रुप आणि डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे स्टार खेळाडू मनीषा बोडस, वीणा जोशी, रंजना पत्की, सुशमा मोघरे, शिल्पा जोशी, राधिका दोरले, मयुरी दीक्षित तसेच पुरुष गटात सुबोध देशपांडे, सूरज चंद्रशेखरन, केदार कसबेकर, मनीष रावत, प्रसाद नाईक यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचे कौशल्य पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75 वर्षांवरील आणि 75 वर्षापुढील पुरुष व महिला अशा विविध वयोगटात सांघिक, एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात खेळवली जाईल. स्पर्धेसाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात 16 नवीन ‘स्टॅग’ टेबल टेनिस टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सामने होतील. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, करंडक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
