Siddharth Venugopal Death | टीव्ही सृष्टीवर शोककळा! ४० व्या वर्षी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
Siddharth Venugopal Death | छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा असलेले अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth Venugopal) यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची माहिती एका सहकलाकार अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, या घटनेमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
सिद्धार्थ वेणुगोपाल यांनी वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून ते गंभीर आजाराशी सामना करत होते आणि उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर सहकारी कलाकार, मित्र आणि चाहत्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने टीव्ही क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेत्री सीमा जी. नायर (Seema G. Nair) यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. त्या उपचाराच्या काळात सातत्याने सिद्धार्थ यांच्या सोबत होत्या. सोशल मीडियावर भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, गेल्या दोन वर्षांत त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र शेवटी देवाच्या इच्छेसमोर सर्व काही थांबले. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमधून त्यांचा मानसिक ताण आणि दुःख स्पष्टपणे दिसून येत आहे.
Siddharth Venugopal Death | कलाविश्वातून शोक व्यक्त, आठवणींना उजाळा :
सिद्धार्थ यांच्या निधनानंतर मल्याळम मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली. सहकलाकार आणि मित्रांनी त्यांना केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे, तर सेटवर नेहमी हसतमुख असणारा सहकारी म्हणूनही आठवले. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा देत कलाकारांनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले.
अभिनेता किशोर सत्या (Kishor Satya) यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आजारपणाच्या काळात मिळालेल्या मदतीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, सिद्धार्थ यांनी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. त्यांच्या उपचारादरम्यान इंडस्ट्रीतील लोकांनीही मदतीचा हात पुढे केला होता. तसेच त्यांनी सीमा जी. नायर यांच्या समर्पणाचे कौतुक करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.
