जामनेरातील फर्निचर दुकानाला रात्री आग:जामनेरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलातील घटना; रात्री उशिरा आगीवर मिळवले नियंत्रण
![]()
शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका फॉर्म अँड फर्निचरच्या दुकानाला गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजे दरम्यान लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.
.
आकाश शार्दुल यांचे येथील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापारी संकुलात घरातील सजावटीसाठी लागणारे पडदे, फोनच्या गाद्या, फायबर दरवाजे, फेविकॉल, टेस्टिंग साठी लागणारे केमिकल अशा साहित्याचे दुकान आहे. यातील बहुतांशी साहित्य हे अति ज्वलनशील आहे. शार्दुल यांनी नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजे दरम्यान दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर दुकानात अचानक आग लागून ज्वाला दुकाना बाहेर येऊ लागल्या. आग लागल्याचे लक्षात येतात शेजाऱ्यांनी तात्काळ संबंधितांना फोन केले. व्यापारी संकुल असल्याने लगतच्या दुकानातील साहित्य तात्काळ सुरक्षित जागी हलवले. या आगीमुळे मात्र लगतच्या दुकानदारांसह शेजारील रहिवासी प्रचंड घाबरले होते.
दरम्यान, जामनेर नगर परिषदेची मोठ्या अग्निशमन बंबाची गाडी नादुरुस्त होती. जामनेर नगर परिषदेच्या छोट्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच साहित्य अति ज्वलनशील असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. अखेर शेंदुर्णी व भुसावळ येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
