उन्हाच्या झळा तीव्र:पारा 41 अंशांवर; आज अन् उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा, दुपारनंतर शहरातील बहुतांशी रस्त्यांवर अघाेषित संचारबंदी
![]()
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांची लाहीलाही होत आहे. बुधवारी तापमानाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ९ एप्रिल रोजी ३४ अंशांवर असलेले तापमान अवघ्या आठ दिवसांत ४१-४२ अंशांवर पोहोचले आहे. यंदा एप्रिलच्या पंधरवड्यातच उन्हाने चाळीशी पार केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे शहरातील रस्ते ओस पडत असून जणू ‘अघोषित संचारबंदी’ असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.अवेळी वाढलेल्या या तापमानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. जमिनीतील ओलावा वेगाने नष्ट होत असल्याने डाळिंब, लिंबू आणि इतर फळबागांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. कडक उन्हामुळे जमीन टणक झाल्याने खरीप पूर्व मशागतीची कामेही रखडली आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “विशेषतः गरोदर माता, आजारी व्यक्ती आणि बालकांनी काळजी घ्यावी. पाणी आणि द्रव पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत काम नसल्यास बाहेर पडणे टाळावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढील ७२ तास जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असून १७ आणि १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मात्र, १८ एप्रिलपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन २२ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
