चोरांनी दागिने ओरबाडले; महिलेचा कान रक्तबंबाळ:शेतवस्तीवर चोरी, सव्वा लाखाचे सोने लंपास
![]()
शिल्लेगाव ते गोळेगाव रस्त्यालगत शेतवस्तीवरील शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश करून महिलांचे मनीमंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीची आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. गणेश बोऱ्हाडे (२९, रा. शिल्लेगाव) यांनी फिर्याद दिली. ते शेत गट नं. १९४ मध्ये वस्ती करून राहतात. आई यमुनाबाई, पत्नी लता, वडील मानिकराव, दोन मुली असे कुटुंब आहे. घर शेतात बांधलेले आहे. घराच्या जिण्याला वर छत नाही. दरवाजेही नाहीत. बुधवारी (दि. १५) रात्री ११.३० वाजता जेवण करून सर्वजण वेगवेगळ्या खोलीत झोपले. गुरूवारी (दि. १६) रात्री ३.१५ वाजता आई यमुनाबाई, पत्नी लता यांच्या ओरडण्याचा आवाज आला. गणेश, वडील उठले. दोन अनोळखी व्यक्ती घराबाहेर पळताना दिसल्या. आईने सांगितले की, डाव्या कानातील टाप्स, वेल कैचीने कापल्याने कानाला जखम झाली. रक्तस्राव झाला. पत्नी लताने सांगितले की, गळ्यातील मनीमंगळसूत्र तोडून नेले. चोरीचा दांगोडा झाल्यानंतर शेताशेजारील किशोर पांडुरंग बर्डे, हरिभाऊ विश्वनाथ बोऱ्हाडे आले. सर्वत्र शोध घेतला. कोणी आढळले नाही. नंतर दागिन्यांची खात्री केली. आईचे कानातील सोन्याचे टाप्स २.५ ग्रॅम, वेल १.५ ग्रॅम (एकूण किंमत ३२ हजार), १० ग्रॅमचे मनीमंगळसूत्र (किंमत ८० हजार), पत्नीचे गळ्यातील ३.५ ग्रॅमचे मनीमंगळसूत्र (किंमत २८ हजार, असा १ लाख ४० हजारांचे) दागिने लांबविले. कारवाईची मागणी फिर्यादीत नमूद केले आहे की, घरात प्रवेश करून आई, पत्नी झोपलेल्या असताना गळ्यातील, कानातील दागिने हिसकावून नेले. तसेच अकोली वाडगाव येथील दोन घरीही चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दोन अनोळखी चोरांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
