महाराष्ट्रात उष्णतेची लाट:विदर्भात सूर्याचा प्रकोप, अकोल्याचा पारा 44 अंश पार, जगातील उष्ण शहरांच्या यादीत गणना; प्रशासन हायअलर्टवर

0
new-project-2026-04-16t164446719_1776338173.jpg




राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे. विदर्भातील अकोला शहराने तर उष्णतेचे जागतिक विक्रम मोडीत काढले असून, ते जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अकोला आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने ‘हाय अलर्ट’ जारी केला असून उष्माघाताचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. अकोल्याचा पारा ४४.२ अंशांवर गेल्याने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. नागरिकांना उन्हापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील शासकीय व ग्रामीण रुग्णालयांत एकूण १३७ उष्माघात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना सतर्क करण्यासाठी ‘दवंडी’ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात ओआरएस (ORS) आणि आवश्यक औषधांचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपुरात उष्माघातासाठी विशेष ‘कोल्ड वॉर्ड’ नागपुरातही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या घरात असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (GMC) अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी माहिती दिली की, उष्माघाताच्या रुग्णांच्या शरीराचे तापमान तातडीने कमी करण्यासाठी विशेष ‘कोल्ड वॉर्ड’ तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये एसी, कुलर आणि कोल्ड बाथची (थंड पाण्याचे टब) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील इतर शहरांचे तापमान: मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशी ४० पार मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सलग पाच दिवसांपासून पारा ४१ अंशांच्या वर आहे. परभणीमध्ये आज ४१.०४ अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तर हिंगोलीतील ४१ अंश तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. रस्त्यावर लोक डोक्याला रुमाल आणि गमछा बांधूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुणेकरांना १७ एप्रिलला उष्णतेच्या लाटेचा इशारा पुण्यातही तापमानाचा आलेख चढता असून १७ एप्रिल रोजी शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील पारा ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, १८ आणि १९ एप्रिल रोजी पावसाची शक्यता असल्याने पुणेकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो. प्रशासनाकडून नागरिकांसाठी ‘गाईडलाईन्स’ वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तहान नसली तरीही भरपूर पाणी प्या आणि ओआरएस किंवा लिंबू पाण्याचा वापर करा. उन्हात बाहेर पडताना सुती कपडे, टोपी आणि गॉगलचा वापर करा. यासोबतच चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळ जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks