अक्कलकोट नगरी भक्तीच्या रंगामध्ये न्हाली:भाविकांच्या संख्येत मोठी घट, समर्थांच्या व मूळ चरण पादुकांसमोर हजारो स्वामी भक्त नतमस्तक
.

अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी अक्कलकोट नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘श्री स्वामी समर्थ’ आणि ‘गुरुदेव दत्त’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला असला, तरी यंदा वाढते ऊन, मुलांच्या परीक्षा आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे दरवर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. पहाटेपासूनच आलेल्या हजारो भक्तांनी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रद्धेने नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. अक्कलकोटचा पारा ४२ अंश होता, समितीने कापडी मंडप उभारून विशेष सोय केल्याने भाविकांना दिलासा मिळाला. अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना परंपरेनुसार महानैवेद्य दाखवण्यात आला.
पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रीं ची काकड आरती झाली. नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत झाली. पारंपरिक लघु रुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहनराव गुरूजी यांच्या आधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात भक्तिभावाने करण्यात आले. नाम वीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने झाला. श्रींचा सजवलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा वटवृक्ष मंदिरातून सायंकाळी ५ वाजता थाटात निघाला. तहसीलदार विनायक मगर, पोलिस निरीक्षक दिपक भिताडे यांनी भक्तांच्या सुविधेसाठी यंत्रणा नियंत्रित केली होती.
दुपारी १२ वाजता राजवाड्यातून अक्कलकोट राजघराण्याचा आणलेला महानैवेद्य श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना दाखवण्यात आला. सकाळी ११ वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती विश्वस्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रथमेश इंगळे, पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी आदी उपस्थित होते.
^उन्हामुळे व ठिकठिकाणच्या स्वामी मंदिरामुळे भाविकांची संख्या कमी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने व्हावे, यासाठी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय केली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी कापडी मंडप उभारून विशेष सोय केली होती. महेश इंगळे, चेअरमन, देवस्थान.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्म संकीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजन सेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात नामांकित वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.
