हेल्मेट सक्ती, वाहतुकीचे नियम पाळा:अपघात झाल्याच्या स्थितीत जखमींना तत्काळ मदत करा, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचे आवाहन
![]()
शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी ता २० येथे केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले की हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय वाढले असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी होत आहे, एकंदरीत अपघाताचा अभ्यास केल्यास 50 टक्के पेक्षा जास्त अपघातात मोटरसायकलस्वार मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात आजपासून मोटार सायकल चालवणारा व पाठीमागे बसणाऱ्या इसमास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट मोटार सायकल चालू नये, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे , वेळोवेळी चालकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावे, वाहनाचे फिटनेस तपासावे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना त्यांनी दिल्या. अपघात स्थळी नागरिकांनी जखमी लोकांना मदत करावी, तात्काळ 112 व 108 वर निशुल्क कॉल करून पोलीस व वैद्यकीय मदत बोलावून घ्यावी व हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. अपघातात मदत करणाऱ्या लोकांची ओळख देणे बंधनकारक नाही तसेच त्यांना कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागणार नाही . तसेच पीएम राहत योजनेअंतर्गत अपघातात जखमी इसमांना मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये दीड लाखापर्यंत मोफत उपचार असणार आहे असे त्यांनी सांगितले. परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा वाहतूक नियमाबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन चालू नये, पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना वाहन देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले.
सदर प्रसंगी वैद्यकीय पथकाद्वारे प्रथमोपचार बाबत व सीपीआर बाबत प्रात्याक्षीक दाखवण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे जमीर नाईक, शरद मरे, परिवहन विभागाचे चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने यांचे सह डॉक्टर पथक , सर्व ठाणेदार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले.
