सोलापूर पाणी योजनेसाठी मनपा बाँडद्वारे 200 कोटी उभारणार:दरमहा 4 कोटी व्याज, 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत होणार चर्चा
![]()
सोलापूर शहराच्या 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपा आपला हिस्सा भरण्यासाठी ‘बाँड’ च्या स्वरुपात 200 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. या योजनेचा विषय मनपाच्या 20 एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे. तिथे अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. व्याजदर, परताव्याची हमी दिली तर चांगल्या कंपन्या, नागरिकांचा सहभाग वाढेल, असे तज्ञांचे मत आहे. हे बाँडमध्ये दोन प्रकार असून एक पब्लिक बाँड आणि दुसरे प्रायव्हेट बाँड आहे. पब्लिक बाँड या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येते, तर प्रायव्हेट बाँड प्रकारात फक्त कंपन्यांना सहभागी होता येते. सोलापूर मनपाने मात्र हे दोन्ही पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. यासाठी ‘एस्क्रो’ बँक खाते उघडले जाणार आहे. जर मनपा वेळेत व्याज देऊ शकली नाही तर या खात्यातून व्याज वळते केले जाईल. पाणी योजनेसाठी जागतिक बँक 600 कोटी देणार आहे. बाँडच्या माध्यमातून जे गुंतवणुकदार गुंतवणूक करतील त्यांना जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. पहिले तीन वर्षे फक्त व्याज, नंतर 7 वर्षे मुद्दलही मिळेल नाशिक मनपा बाँडधारकांना 8.20 टक्के व्याजदर देत आहे. सोलापूरमध्ये व्याज दर निश्चित नाही. व्याज दर महिन्याला द्यायचे की सहा महिन्याला हेही ठरले नाही. मात्र 200 कोटींसाठी सुमारे 4 कोटी रुपये दरमहा व्याज द्यावे लागेल. सुरुवातीचे तीन वर्ष फक्त व्याज दिले जाणार. नंतर सात वर्षात व्याज व मुद्दल दोन्ही परतावा करावा लागेल. परताव्यासाठी दहा वर्षाचा कालावधी असेल. या सर्व मुद्द्यांची अंतिम रूपरेषा सर्वसाधारण सभेत व जागतिक बॅँकेशी चर्चा ठरवली जाईल. 10 वर्षात परतावा होईल का? याचा विचार करावा सोलापूर पालिकेनेही 8.20 टक्के व्याज दिले तर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल. मात्र, दहा वर्षात परतावा होईल का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. बाँड घेतल्यानंतर जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळण्याचा प्रश्न नाही. महापालिका गॅरंटी काय देणार? परतावा कसा करणार ? या गोष्टींचा करार झाला की चांगल्या कंपन्या येतीलच. प्रायव्हेट बाँडसह पब्लिक बाँड ही सुरु केले तर अधिक चांगला प्रतिसाद मिळेल. – धनराज नोगजा, सी.ए. नळांना मीटर, मक्तेदार वसूल करेल पाणीपट्टी जागतिक बँक 600 रुपयांचे कर्ज देत आहे. केंद्रीय योजनेतून 300 कोटी आणि बाँडच्या माध्यमातून 200 कोटी उभे केले जातील. ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र नळांना मीटर लागेल. देखभाल व पाणीपट्टी वसूली मक्तेदारामार्फत केली जाईल. जागतिक बँकेतून प्रथम निधी मिळेल. योजनेचे पन्नास टक्के काम झाल्यानंतर महापालिका निधी उभा करणार आहे. त्यामुळे बाँडचा विषय कदाचित पुढच्या वर्षी सुरु होईल. जागतिक बँकेच्या निधीचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर होईल बाँड काढण्याची प्रक्रिया 1400 कोटी रुपयांच्या पाण्याच्या योजनेसाठी 200 कोटींचा निधी उभा करण्यासाठी मनपा बाँडच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सर्व प्रकिया एकदा पूर्ण झाली की बाँडबाबतच्या कारवाईला सुरुवात होईल. मनपा आयुक्तांकडून तसे आवाहन केले जाईल. कंपनी व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. -रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा अधिकारी, मनपा
