५० लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण:खडी क्रशरच्या बहाण्याने फसवणूक, पाच आरोपींना अटक
![]()
पुण्यात एका उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखवण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी खराडी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. कानपूरचे रहिवासी असलेले ४० वर्षीय व्यावसायिक सध्या पुण्यात गहुंजे येथे राहतात. त्यांची आरोपी सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) यांच्याशी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवण्याचे आमिष दाखवून खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले. दुपारी १२ वाजता ते एका उपाहारगृहाजवळ थांबले होते. जागा दाखवण्याच्या बहाण्याने आरोपींनी व्यावसायिकाला मोटारीतून एका अज्ञात ठिकाणी नेले. तिथे त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. खंडणीची मागणी केल्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला खराडी परिसरात सोडून पळ काढला. घाबरलेल्या व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून फरार झालेल्या पाचही आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोडसे पुढील तपास करत आहेत.
