महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात; 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी राज्याची स्थिती:पोलिसांची बडतर्फी म्हणजे गृहविभागाचे अपयश- विजय वडेट्टीवार
![]()
महाराष्ट्रात अंमली पदार्थांचे जाळे आता केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता विदर्भातील ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. राज्याची स्थिती 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी होत आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, 2024 पासून जप्त करण्यात आलेला हजारो कोटींचा साठा आणि वाढती गुन्हेगारी पाहता, राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. नेस्को सेंटरमधील ताज्या प्रकरणाचा हवाला देत त्यांनी गृहविभागाच्या अपयशावर बोट ठेवले असून, तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बडतर्फीनंतर आता या माफियांच्या पाठीशी असलेल्या ‘राजकीय शक्तीं’चा शोध घेण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. तरुणाई वाचवण्यासाठी महाराष्ट्र तातडीने ‘ड्रगमुक्त’ करण्याची गरज वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. वडेट्टीवारांची पोस्ट काय? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्राला ड्रगमुक्त करण्याची गरज! महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. 10 वर्षांपूर्वी जे प्रमाण पंजाबमध्ये होते, आता तशीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसतेय. अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे. केवळ मुंबई-पुणेच नाही, तर आता नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील ग्रामीण भागातही अंमली पदार्थांच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. ‘नेस्को सेंटर’मधील ताज्या प्रकरणामुळे राज्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात कशी अडकतेय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. वडेट्टीवारांनी सांगितली आकडेवारी विजय वडेट्टीवार म्हणाले की, सन 2024 मध्ये 4,249 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर 2025 पासून आतापर्यंत 15,933 आरोपींना अटक झाली आहे. 2026 मध्ये केवळ काही महिन्यांतच 1,438 गुन्हे नोंदवले गेले असून 1,637 आरोपींना अटक करण्यात आली आणि 940 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अजून वर्षाचे अर्धेही पूर्ण झालेले नाही, तरी ही आकडेवारी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दाखवते. माफियाच्या राजकीय शक्तींना कधी शोधणार? विजय वडेट्टीवार म्हणाले की, अंमली पदार्थ तस्करीत मदत करणाऱ्या 17 पोलिसांना बडतर्फ करावे लागणे, हे राज्याच्या गृहविभागाचे मोठे अपयश आहे. जेव्हा खाकी वर्दीच तस्करांना साथ देते, तेव्हा नेस्को सेंटरसारखी प्रकरणे गल्लोगल्ली घडणारच. केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, या ‘ड्रग्ज माफिया’च्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तींना कधी शोधणार? महाराष्ट्र ड्रगमुक्त करण्याची गरज आहे नाहीतर तरुणाई उध्वस्त होईल महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल!
