![]()
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांनी राजशिष्टाचार डावलल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवून या कृतीचा समाचार घेतला आहे. जीएमसीमधील अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर्सची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि खनिकर्म प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९६ लाख ५० हजार रुपये व्हेंटिलेटर्ससाठी, तर ३ कोटी ४१ लाख ४२ हजार रुपये इतर उपकरणांसाठी खर्च करण्यात आले आहेत. या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यंत्रसामग्री जीएमसीमध्ये स्थापित करण्यात आली आहे. या खर्चाला अंतिम मान्यता देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे यंत्रसामग्रीची पडताळणी केली जाते. यासाठी जिल्हाधिकारी आणि समितीच्या इतर सदस्यांशी चर्चा करून सादरीकरणाची (डेमो) तारीख ठरवणे अपेक्षित असते. मात्र, डॉ. राऊत यांनी कोणतीही पूर्वचर्चा न करता थेट जिल्हाधिकारी व इतर सदस्यांना पत्र पाठवून २४ ऑगस्ट रोजी डेमो ठेवल्याचे कळवले. डॉ. राऊत यांची ही कृती राजशिष्टाचाराला धरून नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना खरमरीत पत्र पाठवले. या कृतीमागे त्यांचा वाईट हेतू दडलेला असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. तसेच, असा डेमो ठरवण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तारीख व वेळ निश्चित करावी, अशी सूचनाही पत्राद्वारे करण्यात आली आहे. अधीष्ठात्यांची ही कृती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही खटकल्याचे समजते. त्यांच्या कार्यालयाकडूनही डीन यांना विचारपूस करण्यात आली आहे. वरिष्ठांना विश्वासात न घेता परस्पर सादरीकरण आयोजित केल्याबद्दल वैद्यकीय व महसूल विभागात चर्चा सुरू आहे. यावर डॉ. नंदकिशोर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले की, डेमो आयोजित करण्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. कंपनीचे अधिकारी आणि इतरांची वेळ जुळवून ती तारीख ठरवली होती. आता जिल्हाधिकारी महोदयांच्या पूर्वपरवानगीने नवी तारीख ठरवली जाईल.
जीएमसी डीन डॉ. राऊत यांनी राजशिष्टाचार डावलला:जिल्हाधिकाऱ्यांचे खरमरीत पत्र; वैद्यकीय उपकरणांच्या सादरीकरणावरून वाद
