नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक शाखेकडून दररोज नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केल्याच्या प्रेस नोटा मोठ्या थाटामाटात प्रसिद्ध केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात शहरातील काही ठिकाणी वाहतूक नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा मात्र कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवाजीनगर कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डाव्या उतारावर सध्या अनधिकृत पार्किंगचा अक्षरशः बाजार भरत आहे. रुग्णालयांच्या परिसरातील रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या खासगी गाड्या तसेच इतर वाहनांची रांग रस्त्याच्या एका बाजूला कायमस्वरूपी लागलेली दिसते. परिणामी रुंद रस्ता अर्धाच उरतो आणि उर्वरित जागेतून वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागतो.
या ठिकाणी रोज वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आपत्कालीन कामासाठी धावणाऱ्या वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत आहे. रुग्णवाहिका, शासकीय कामे किंवा तातडीच्या कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांचा वेळ या विशेष पार्किंग व्यवस्थेमुळे वाया जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नांदेड शहरात दोन स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहेत. शिवाजीनगर उड्डाणपूल परिसर हा वाहतूक शाखा क्रमांक १ च्या कार्यक्षेत्रात येतो. या शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आहेत. मात्र संबंधित ठिकाणी दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक नियंत्रणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक शाखेने केवळ प्रेस नोटा काढण्यापेक्षा या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करून अनधिकृत पार्किंग हटवावे, संबंधित वाहनधारकांना समज द्यावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा उड्डाणपूल वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Post Views: 431
