खत बुकिंग ॲपमुळे शेतकरी त्रस्त; तात्पुरती स्थगितीची मागणी:खासदार डॉ. कल्याण काळे, संदीपान भुमरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या खत बुकिंग मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर या ॲपमुळे शेतकऱ्यांना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, ही प्रणाली चालू खरीप हंगाम संपेपर्यंत तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि खासदार संदीपान भुमरे यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. बुधवारी (१७ जून) नवी दिल्ली येथे दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्री नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या समस्येबाबत सविस्तर निवेदन सादर केले. केंद्रीय मंत्र्यांनी या विषयाची सकारात्मक दखल घेत तातडीने आढावा घेण्याचे आश्वासन दिले. खत बुकिंग करताना सातत्याने सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक त्रुटी निर्माण होणे यामुळे वेळेत बुकिंग होत नाही. पेरणीच्या आणि खतांच्या आवश्यकतेच्या काळात तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना या नव्या मोबाईल प्रणालीचा वापर कसा करावा, याचे कोणतेही पूर्वप्रशिक्षण मिळालेले नाही. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करताना खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, “खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या काळात विनाअडथळा खत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र, या प्रायोगिक प्रणालीमुळे शेतीच्या कामांवर गदा आली आहे. त्यामुळे ही प्रणाली सध्या स्थगित करून आधी सर्व्हरच्या समस्या, तांत्रिक त्रुटी आणि व्यावहारिक अडचणींचा सखोल अभ्यास करावा. यात आवश्यक सुधारणा केल्यानंतरच ती पुन्हा लागू करावी.” यावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांशी संबंधित लोकप्रतिनिधींनी मांडलेली ही समस्या अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. या मोबाईल प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा तातडीने आढावा घेऊन योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *