बारामती पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले!:सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा कन्हेरीतून प्रारंभ, अजितदादांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होत सुरुवात

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-12t120731496_1775975899.jpg




बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांनी कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेत तसेच अजित पवारांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक होत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. कन्हेरी मारुती मंदिराच्या समोरच पक्षाची सभा पार पडत आहे. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, संजय बनसोडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना मंत्री अदिती तटकरे अजितदादांच्या आठवणीत पुन्हा एकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या, राज्याची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी यांना संधी मिळाली. आमच्या सगळ्यांची इच्छा होती की अजित दादांना आम्हाला मुख्यमंत्री पदावर बघायचे होते. कदाचित या आमच्या सगळ्यांचे दुर्दैव असेल की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लाभू शकला नाही हे महाराष्ट्राचे दुःख आहे. हे स्वप्न काकी तुमच्या माध्यमातून पूर्ण व्हावे, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, असे तटकरे म्हणाल्या. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंनी व्यक्त केल्या भावना शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, त्या म्हणाल्या, या मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पोटनिवडणूक लढवत आहेत. दादांच्या अकाली जाण्याने सुनेत्रा वहिनी यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. अजित दादांनी बारामती विकासाचे स्वप्न पाहिले होते आणि आम्ही बीडकर सुद्धा विचार करत होतो की बीडचे पालकमंत्री झाल्यावर बीडचाही कायापालट होईल असे वाटत होते. सुनेत्रा वहिनींनी आता हे शिवधनुष्य पेलण्याचे काम स्वीकारले आहे. या पुरोगामी महाराष्ट्राने महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी यांना पाहिले आहे. वहिनी निवडून तर येणार आहेतच, परंतु, नियतीने येथील मतदारांना संधी दिली आहे की प्रचंड बहुमताने वहिनींना निवडून आणायचे आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, आज दादा आपल्यात राहिले नाहीत. काम करणारा नेता आपल्यात नाही. आज या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सुनेत्रा वहिनी पवार यांचे चिन्ह आहे घड्याळ हे बटन दाबावे, असे आवाहन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. ज्या नेत्याने लाडक्या बहीणींसाठी योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना दिल्या, आज प्रत्येकाला त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, अशा भावना भरणे यांनी व्यक्त केल्या आहेत. एकच वादा अजितदादा, एकच वादा वहिनी दादा- सना मलिक सना मलिक म्हणाल्या, आज अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांनी जाताना त्यांच्या मागे तीन लोक सोडले आहेत. बारामतीसाठी या राज्यासाठी सुनेत्रा वहिनी, जय पवार आणि पार्थ पवार यांना मागे सोडले आहे. वर्षानुवर्ष तुम्ही जसे अजितदादांना निवडून देत आलात, तसेच आता सुनेत्रा वहिनीला निवडून आणायचे आहे, असे आवाहन मलिक यांनी केले. तसेच त्यांनी यावेळी घोषणा दिली की, “एकच वादा अजितदादा, एकच वादा वहिनी दादा.” बारामतीच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय- दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील म्हणाले, आजची ही निवडणूक वेगळी आहे. ही नियतीने लादलेली निवडणूक आहे. अजितदादांविषयी बोलायचे म्हटले तर खूप वेळ लागेल. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. बारामतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, सहकरी संस्थान असतील, शिक्षण क्षेत्रातील लोक असतील, सगळ्यांना मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो की या निवडणुकीचे मतदान 23 तारखेला होणार आहे. दादांची महती राज्यात, देशात आहे. त्यांना शेवटच्या रांगेतल्या व्यक्तीचे नाव देखील माहीत असायचे. आज दादा आपल्यात नाहीत. ते नाहीत याचे दुःख तर आहेच. शब्द रूपाने भावना व्यक्त करता येतात, पण दुःख वाटून घेता येत नाही. बारामती पोरकी नाही झाली, पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed