आशाताईंच्या निधनाने सचिन तेंडुलकरही गहिवरला:म्हणाला – आमच्यासाठी त्या कुटुंबाचाच भाग होत्या, तुमची खूप आठवण येईल

0
db-temp-cover-marathi-2026-04-12t181321846_1775997808.jpg




भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आपल्या आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद प्रसंगी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन आणि आशाताईंमधील नाते हे केवळ कलाकार आणि चाहता असे नव्हते, तर ते एका आई आणि मुलासारखे घट्ट होते. आशाताईंच्या जाण्याने तेंडुलकर कुटुंबाने आपला एक मार्गदर्शक आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजचा दिवस केवळ भारतासाठीच नाही, तर जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या आमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग होत्या. आज जे दुःख होत आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. काळ जणू थांबला आहे असं वाटतंय, पण त्यांची अजरामर गाणी त्यांना कायम आमच्यात जिवंत ठेवतील. धन्यवाद ताई, आमचं आयुष्य तुमच्या सुरांनी आणि प्रेमाने समृद्ध केल्याबद्दल. तुमची खूप आठवण येईल, असे तो म्हणाला. आशा भोसलेंचे सचिन तेंडुलकरच्या नावाशी खास कनेक्शन सचिन आणि आशाताईंचे नाते केवळ ओळखीपुरते नव्हते, तर ते अत्यंत घट्ट आणि कौटुंबिक होते. या नात्यामागे एक रंजक इतिहास आहे. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे महान संगीतकार सचिन देव बर्मन (एस.डी. बर्मन) यांचे मोठे चाहते होते. त्यांच्याच नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘सचिन’ ठेवले. योगायोगाने एस.डी. बर्मन यांचा मुलगा आर.डी. बर्मन (पंचम दा) हे आशा भोसले यांचे पती होते. अर्जुनचे लग्न आणि आशाताईंची ‘अंतिम’ उपस्थिती आशाताईंनी वयाच्या ९२ व्या वर्षीही तेंडुलकर घराण्यातील आनंदात उत्साहाने सहभाग घेतला होता. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया यांच्या नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्याला आशाताईंनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले होते. या सोहळ्यातील त्यांचा आनंदी व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सार्वजनिक कार्यक्रमातील ही त्यांची शेवटची उपस्थिती ठरली आहे. आशाताईंकडून सचिनच्या नम्रतेचे कौतुक आशा भोसले यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, सचिन त्यांच्यासाठी मुलासारखा आहे. त्या सचिनला केवळ एक महान खेळाडूच नव्हे, तर एक आदर्श व्यक्तीही मानतात. सचिन आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना आणि प्रसिध्दी मिळवल्यानंतरही तो तितकाच नम्र असल्याचे अनेकदा आशाताईंनी म्हटले आहे. २०१३ मध्ये आशाताईंच्या ‘माई’ या पहिल्या चित्रपटाच्या संगीत अनावरणावेळी सचिन आवर्जून उपस्थित होता. “सचिनला माझ्याबद्दल इतका आदर आहे की मी जेव्हा कधी त्याला बोलावते, तेव्हा तो कधीही ‘मी येऊ शकत नाही’ असे म्हणत नाही. सचिन जसाजसा त्याच्या जीवनात यशस्वी होत आहे, त्याप्रमाणेच अधिक नम्र होत आहे, असे उद्गार आशाताईंनी काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed