राहुरीत 'राजकीय बॉम्ब'!:मी भाजपमध्ये गेलोच नाही, अजूनही मविआतच; प्राजक्त तनपुरेंच्या विधानाने महायुतीच्या गोटात धाकधूक
![]()
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे रणमैदान तापलेले असतानाच, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या एका ‘राजकीय बॉम्ब’मुळे महायुती आणि भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. “मी अजून महाविकास आघाडी सोडलेली नाही आणि भाजपमध्येही प्रवेश केलेला नाही,” असे स्पष्ट करत तनपुरे यांनी भाजपच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. त्यांच्या या विधानाचा थेट परिणाम भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या मतदानावर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राहुल पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. अशातच निवडणुकीतून माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे भाजपला साथ देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एका मुलाखतीत तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वांनाच धक्का दिला. ते म्हणाले, “मी महाविकास आघाडी सोडलेली नाही. २०२९ च्या रणसंग्रामात मी पूर्ण ताकदीने उतरणारच आहे. सध्याच्या सरकारने माझे काही प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असेल, तर त्याचा अर्थ मी महाविकास आघाडी कमकुवत केली असा होत नाही.” भाजपमध्ये चिंतेचे वातावरण प्राजक्त तनपुरे यांच्या या विधानामुळे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तनपुरे यांनी जरी निवडणूक लढवली नसली, तरी त्यांच्या शब्दाला मानणारा मोठा वर्ग राहुरीत आहे. त्यांनी ‘मविआ’तच असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपला मिळणाऱ्या हक्काच्या मतांमध्ये घट होऊ शकते, असे निरीक्षण स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे नोंदवले आहे. ‘चिल्लर’ आणि ‘बालिश’ लोकांकडे लक्ष नाही! “प्राजक्त तनपुरे उभे राहिले असते, तरी अक्षय कर्डिलेंविरुद्ध त्यांचा पराभव झाला असता,” अशा भाजप कार्यकर्त्यांच्या टीकेवर तनपुरे यांनी कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, “हा केवळ त्यांचा बालिशपणा आहे. मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपमधीलच मोठ्या नेत्यांनी माझे आभार मानले. प्रत्येक पक्षात काही ‘चिल्लर’ लोक असतात जे असे कमेंट्स करतात. माझी ताकत काय आहे, हे मला आणि माझ्या पाठीशी उभे असलेल्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे.” २०२९ चे लक्ष्य डोळ्यासमोर आगामी रणनीती स्पष्ट करताना प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, २०२९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. सध्याच्या उमेदवाराच्या वडिलांच्या निधनामुळे ही पोट निवडणूक होत आहे, मात्र या ठिकाणी मविआ कुठेही कमकुवत नसून वेळ येईल तेव्हा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
