आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण
![]()
माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या आठवणी जागवत त्यांची नांदेडला येण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. आशाताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर एकेक अवयव निकामी होत गेल्यामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वा. शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. राज्यातील सर्वच लहान थोर नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आशाताईंच्या आठवणी जागवल्या आहेत. मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचं आहे अशोक चव्हाण म्हणाले, आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली! आशाताई भोसले केवळ एक अद्वितीय गायिका नव्हत्या, तर त्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या जाण्याने आज त्यांच्या अनेक आठवणी दाटून येत आहेत. कोरोना काळानंतरचा तो दिवस मला आजही आठवतो. आमचे स्नेही प्रसाद महाडकर यांचा फोन आला. ते म्हणाले, आशाताई बोलणार आहेत आणि दुसऱ्या क्षणी आशाताईंचा आवाज कानी पडला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचं आहे. आपण तो कार्यक्रम लवकरच ठरवूया.” मी आनंदाने त्यांना होकार दिला आणि त्यांच्या सोयीची तारीख कळवण्याची विनंती केली. पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. दुर्दैवाने तो योग जुळून आला नाही. ९० च्या दशकात त्या एकदा नांदेडला आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नांदेडला पुन्हा भेट देण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली, याची सल आज मनाला जाणवतेय. आशाताईंशी संवाद साधण्याची संधी मला अनेकदा लाभली. कधी प्रत्यक्ष भेटीतून, तर कधी फोनवरील संभाषणातून त्यांचं मोठेपण अनुभवायला मिळालं. एकदा गणेशोत्सवात त्या दर्शनासाठी घरी आल्या होत्या. त्यांची विनम्रता आणि आपुलकी त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढवणारी होती. नांदेडमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ कार्यक्रमासाठी देखील मी त्यांना विनंती केली होती. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष अनुभवता यावेत, अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमुळे ते राहिलं आणि आता ती संधी कायमचीच हुकली. गायक म्हणून आशाताई भोसले अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच ‘ग्रेट’ होत्या. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सुरांची बाग आज उजाड झाली – मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका पोस्टद्वारे आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
