अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करत बलात्कार:भोंदूबाबाने महिलेची केली ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
![]()
पुण्यात एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केला आणि तिची ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते आणि त्या वेगळ्या राहत होत्या. सुमारे पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीमार्फत त्यांची गडदे याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर गडदे याने स्वतःला देवऋषी असल्याचे भासवले. आपल्या अंगात दैवीशक्तीचा संचार असून कौटुंबिक समस्या दूर करण्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. या आमिषाने त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतरही आरोपी गडदेने महिलेला माणगाव परिसरातील एका लॉजवर बोलावून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तसेच, नोकरी आणि बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याने महिलेकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. यात काही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात आली, तर काही दागिनेही घेण्यात आले. हा प्रकार गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. यापूर्वीही पुण्यात दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती. नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषीकेश वैद्य प्रकरणे ताजी असतानाच ही नवीन घटना उघडकीस आली आहे.
