राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रातून पुढाकार घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लावणी कलाकारांनी 1 लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे. या रकमेचा धनादेश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, या उद्देशाने कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला विविध कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लावणी कलाकारांनी एकत्र येत 1 लाख रुपयांचा निधी जमा केला. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी हा धनादेश मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द केला. कलाकारांच्या सहभागातून सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा हा उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहे विनामूल्य उपलब्ध या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची नाट्यगृहे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना अकादमीच्या उपलब्ध तारखांनुसार नाट्यगृहे वापरता येणार आहेत. या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून मिळणारा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी 5 ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अकादमीने नाट्यगृहे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम तूर्तास 31 मार्च 2027 पर्यंत राबविण्यात येणार आहे. लावणी, संगीत, नृत्य, नाटक आणि हिंदी चित्रपटगीतांवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करून निधी संकलित केला जाणार आहे. त्यामुळे कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार असून, त्याचबरोबर सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदानही देता येणार आहे. लावणीपासून संगीत नाटकांपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल या उपक्रमांतर्गत 26 ऑक्टोबर रोजी लावणी कलावंत महासंघाच्या वतीने ‘लावण्यसोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कविता घडशी, आकांक्षा कदम, विद्या सदाफुले, गौरी जाधव, मोना गावडे, वर्षा दर्पे आणि हर्षला राऊत यांच्यासह विविध लावणी कलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्यात आले. येत्या 12 नोव्हेंबर रोजी संस्कृती फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांवर आधारित विशेष नृत्यसादरीकरण आयोजित करण्यात येणार आहे. गुरु शुभदा वराडकर यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच, 14 नोव्हेंबर रोजी ‘अमरदीप, कल्पकला आणि सृजन’ निर्मित ‘आता थांबवायचं कसं’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक हे कलाकार सहभागी होणार आहेत. राहुल देशपांडे, अर्चना अनिरुद्ध यांचेही कार्यक्रम या उपक्रमांतर्गत आगामी काळात अनेक नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. 6 डिसेंबर रोजी गायक राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 9 जानेवारी 2027 रोजी अर्चना अनिरुद्ध यांचा ‘शाम-ए-अदा’ हा बॉलिवूड गीतांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 12 जानेवारी रोजी संजीवनी भेलांडे यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. याशिवाय पुण्यातील भरत नाट्यसंशोधन मंदिराच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सलग तीन दिवस संगीत नाटक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे. या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी योगदान देणार आहेत. नाट्यगृहांसह प्रकाश आणि ध्वनिव्यवस्थाही मोफत या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सांस्कृतिक संस्था आणि कलाकारांना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या उपलब्धतेनुसार नाट्यगृह, तालीम दालन तसेच उपलब्ध प्रकाश आणि ध्वनिव्यवस्थेच्या सुविधा विनामूल्य दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संस्थांना होणारा खर्च कमी होणार आहे. मात्र, कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करावयाची रक्कम अकादमीच्या नियमावलीनुसार निश्चित करण्यात आली आहे. संबंधित संस्थांना निर्धारित रकमेचा धनादेश कार्यक्रमाच्या दिवशी अकादमी प्रशासनाकडे सुपूर्द करावा लागणार आहे. तसेच कार्यक्रमांच्या जाहिराती, निमंत्रणपत्रिका आणि प्रसिद्धी साहित्यामध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. अकादमीचा लोगोही प्रसिद्धी साहित्यामध्ये ठळकपणे वापरावा लागणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कलाकारांना आवाहन कलेच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची संधी या उपक्रमामुळे कलाकारांना मिळत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था, कलाकार आणि संघटनांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. लावणी कलाकारांनी 1 लाख रुपयांचा निधी देत या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. आगामी काळातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन केले जाणार आहे. कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. हेही वाचा… गोकुळमधील संचालक वाढीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल:म्हणाले, लोकांना जेनझीप्रमाणे रस्त्यावर उतरावे लागेल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोकुळ दूध संघातील संचालकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गोकुळसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम सहकारी संस्थेत कायद्यात बदल करून हस्तक्षेप करणे, हा हुकूमशाही आणि दादागिरीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी जेनझी तरुणांप्रमाणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. अन्यथा सरकार लोकांचे प्रश्न आणि आंदोलने दडपून टाकेल, असा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा…

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search