एकीकडे नाशिकमध्ये महाकुंभमेळ्याचा उत्साह पाहायला मिळत असून देशभरातील भाविकांची मोठी गर्दी शहरात उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त असतानाच, नाशिक महानगरपालिकेतील एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीला वेग आला. भारतीय जनता पार्टीकडून महापालिकेसाठी आपल्या कोट्यातील सहा स्वीकृत नगरसेवकांची नावे आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीनंतर गेल्या नऊ महिन्यांपासून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीमुळे या प्रक्रियेची 21 ऑक्टोबरची मुदत वाढवून 4 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस असल्याने भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या गटनेत्यांनी अखेर महापालिका आयुक्तांकडे आपापल्या उमेदवारांची नावे सादर करत या प्रक्रियेला मुहूर्त मिळवून दिला. सहा जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब भाजपकडून सुरुवातीला सुनील केदार, डॉ. विनय मोगल यांच्यासह अनेक नावांची चर्चा होती. मात्र, आज जाहीर झालेल्या अंतिम यादीनुसार अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी या पाच जणांची नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, भाजपने एका जागेवर रोहिणी नायडू यांच्या रूपाने महिलेलाही महापालिका सभागृहात स्वीकृत नगरसेविका म्हणून संधी दिली आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत बोलताना भाजपचे गटनेते श्याम बडोदे यांनी स्पष्ट केले की, पक्षात अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांनाच ही संधी देण्यात आली आहे. भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश हा नेहमीच अंतिम मानला जातो आणि त्याच भूमिकेतून या नियुक्त्या करण्यात आल्याचे मत महापौर हिमगौरी आडके यांनी व्यक्त केले. शहराच्या विकासाचा संकल्प नियुक्तीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शहराचा सर्वांगीण विकास साधून नाशिककरांना न्याय देण्याची आपली प्रामाणिक भावना राहील, असा विश्वास हेमंत धात्रक यांनी व्यक्त केला. तर, शिक्षण क्षेत्र आणि शहरातील इतर मुख्य समस्या सोडवण्यासाठी आपण सर्व स्तरांतून जास्तीत जास्त प्रयत्न करू, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search