गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण
![]()
अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी १९१४ मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारांवर कार्यरत आहे. त्यांच्या प्रेरणेने संस्थेतून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पालकमंत्र्यांनी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या समर्पित कार्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. विजय पांडे आणि आशीष हाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन आणि कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्यावतीने पालकमंत्री बावनकुळे यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरणताई महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
