मुंबईच्या नालेसफाईचा 'राडारोडा':गाळाऐवजी मलब्याचा खेळ, 250 कोटींच्या बजेटवर कंत्राटदारांचा डल्ला, आयुक्तांच्या नाकाखाली भ्रष्टाचाराचा 'स्लॅब'
![]()
मुंबईकरांना पावसाळ्यात ‘तुंबई’पासून वाचवण्यासाठी दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये पाण्यात सोडणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार किती ‘सडलेला’ आहे, याचे जिवंत उदाहरण बोरिवलीत उघड झाले आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराची हिंमत इतकी वाढली आहे की, नाल्यातून गाळ उपसण्याऐवजी तिथे चक्क सिमेंट रस्त्यांचे अख्खे ‘स्लॅब’ आणि ‘डिव्हायडर’ गाडले जात आहेत. स्वपक्षाच्याच सत्ताकाळात कंत्राटदारांचे हे ‘डेअरिंग’ पाहून भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी थेट नाल्याच्या काठावर धाव घेत हा महाभ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. गाळाऐवजी मलब्याचा खेळ; प्रशासनाची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक बोरिवलीतील या नाल्यात कंत्राटदाराने गाळ काढण्याचे कष्ट घेण्याऐवजी रस्ते खोदाईचा राडारोडा टाकून नवा ‘लेयर’ तयार केला होता. विशेष म्हणजे, यंदा मोठ्या नाल्यांसाठी सुमारे १६० कोटी आणि लहान नाल्यांसाठी ९० कोटींची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर सफाईऐवजी केवळ ‘कागदी घोडे’ नाचवून जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात मुंबई पुन्हा ‘तुंबई’? कंत्राटदार केवळ मलब्याचे वजन वाढवून बिले लाटण्यात मग्न आहेत आणि एसी केबिनमध्ये बसलेले अधिकारी याला मूक संमती देत आहेत. या २५० कोटींच्या कथित नालेसफाईनंतरही जर मुंबई जलमय झाली, तर या ‘पांढऱ्या हत्तींना’ जाब कोण विचारणार? असा संतप्त सवाल आता मुंबईकर विचारत आहेत. कारवाई होईपर्यंत मलबा उचलू देणार नाही “हा उघड दरोडा आहे! सीसी रोडचे स्लॅब नाल्यात येतातच कसे? यात कचरा नाही तर केवळ रस्ता खोदून आणलेला मलबा आहे. कंत्राटदाराने या मलब्यावर काळपट गाळाचा मुलामा चढवून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. दोषींवर फौजदारी कारवाई होईपर्यंत हा मलबा उचलू देणार नाही.” — संजय उपाध्याय, आमदार, भाजप
